मुंबई : मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालं आहे. 1 एप्रिलपासून वेतन आयोगाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे.


मुंबई महापालिका कर्मचारी संघटना आणि आयुक्त अजॉय मेहता यांच्यातील बैठकीत पालिका कर्मचाऱ्यांच्या अंतरीम वेतनवाढ आणि सातव्या वेतन आयोगावर चर्चा झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सातव्या वेतन आयोगाची 37 महिन्यांची थकबाकीपोटी कर्मचाऱ्यांना अंतरीम वेतनवाढ मंजूर करण्यात आली आहे. तसचे या 37 महिन्यांच्या थकबाकीतून 20 टक्के रक्कम फेब्रुवारी 2019 च्या वेतनाबरोबर दिली जाणार आहे. या निर्णयाचा एक लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.

सातवा वेतन आयोग लागू होत नसल्याबद्दल पालिका कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष होता. याविषयी अनेक बैठका होऊनही ठोस निर्णय झाला नाही. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घातले.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनंतर आता पालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्याने कर्मचाऱ्यांत आनंदाचं वातावरण आहे. खूप दिवसांपासून कामगार संघटनांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली होती.