कल्याण : कल्याणच्या बारावे परिसरात उभारण्यात येत असलेल्या कचरा डेपोला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. या प्रकल्पाविरोधात आज नागरिकांनी केडीएमसीवर मोर्चा काढला.
कल्याणच्या बारावे गावात कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया करणारा एसएलएफ प्रकल्प उभारण्यात येत असून याचा या परिसरात नव्यानं उभ्या राहिलेल्या लोकवस्तीला मोठा त्रास होणार आहे. ज्यावेळी इथे कचरा डेपोचं आरक्षण टाकण्यात आलं, त्यावेळी येथील आजूबाजूचा परिसर रिकामा होता.
मात्र आज वाढलेली लोकवस्ती पाहता हा प्रकल्प अन्य ठिकाणी हलवण्याची नागरिकांची मागणी आहे. यासाठी आज शेकडो नागरिकांनी केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढला. यावेळी केडीएमसी आयुक्तांनी दोन दिवसात जागेची पाहणी करुन निर्णय देऊ, असं आश्वासन दिलं. मात्र सकारात्मक निर्णय न झाल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार घालण्यासह उग्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.