मुंबई : इंटिग्रेटेड कॉलेजमधील प्रवेशाबाबत शिक्षण विभागाने अकरावीच्या विद्यार्थ्यांना सतर्क केले आहे. मुंबई विभागातील तथाकथित इंटिग्रेटेड ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश न घेण्याची विनंती शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने अकरावीला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना केली आहे.
शिक्षण विभागाने काय म्हटले आहे?
“पालक आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की, मुंबई विभागातील कोणत्याही तथाकथित इंटिग्रेटेड कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन नये. जर तुम्ही अशा कॉलेजमध्ये प्रवेश घेतलात आणि भविष्यात कोणत्याही अडचणी निर्माण झाल्या, तर त्याला शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही.”, असं स्पष्ट शब्दात शालेय शिक्षण आणि क्रीड विभागाने आपल्या वेबसाईटवर सूचना दिली आहे.
इंटिग्रेटेड कॉलेज म्हणजे काय?
अकरावीच्या प्रवेशासाठी ज्या इंटेग्रेटेड कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रवेश घेतात, त्या कॉलेजमध्ये त्यांना कॉलेजसोबत कोचिंग क्लासमध्येही प्रवेश घेता येतो. म्हणजे क्लास आणि कॉलेज हे एकच असतं किंवा काही कॉलेज कोणत्यातरी कोचिंग क्लाससोबत जोडलेले असतात. त्यामुळे या कॉलेजमुळे विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासमध्ये पूर्ण वेळ देता येतो. कारण या कॉलेजला रोज हजर राहणे बंधनकारक नसतं.
इंटिग्रेटेड कॉलेज बंद करा : युवासेना
युवासेनेने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत इंटिग्रेटेड कॉलेजचे स्टिंग करुन इंटिग्रेटेड कॉलेजची चौकशी करावी आणि असे कॉलेज बंद करण्याची कारवाई करावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे. यासंदर्भात युवासेनेने शिक्षण उपसंचलक बी. बी. चव्हाण यांना निवेदन दिले.
इंटिग्रेटेड कॉलेजची माहिती काढण्याचे काम सुरु
इंटिग्रेटेड कॉलेजची माहिती काढण्याचे काम सुरु असून, अशा कॉलेजची चौकशी शिक्षण विभाकडून करण्यात येईल. तसेच सर्व ज्युनियर कॉलेजमध्ये ऑनलाईन प्रवेश मार्गदर्शक पुस्तिकेत दर्शविल्याप्रमाणेच फी आकारली जावी, असे आदेशही शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिले आहे.
पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतले आहेत. आता दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने आधीच इंटिग्रेटेड कॉलेजच्या सूचना देणे गरजेचे होते. मात्र, पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर शिक्षण विभागाला तथाकथित इंटिग्रेटेड कॉलेजमध्ये प्रवेश न घेण्याची विनंती करण्यासाठी जाग आल्याचे दिसून येते आहे.