मुंबई : ज्येष्ठ लेखिका, पत्रकार आणि आचार्य अत्रेंच्या कन्या शिरीष पै यांचं आज मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या वयाच्या 88 च्या होत्या.
मराठी साहित्य क्षेत्रात 'हायकू' नावाचा कविता प्रकार पै यांनीच आणला. याशिवाय इंग्रजी आणि मराठीतून अनेक पुस्तकं आणि नाटकं त्यांनी लिहली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
मुंबईतल्या लॉ कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ मराठा या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम केलं.
जपानी साहित्य क्षेत्रातील हायकू हा अल्पाक्षरी काव्यप्रकार त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रात रुजवला. एक तारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतुचक्र हे शिरीष पै यांची काही गाजलेली काव्यसंग्रह आहेत.
यासोबतच लालन बैरागीण, हेही दिवस जातील, या त्यांच्या कादंबऱ्याही प्रचंड लोकप्रिय ठरल्या. आजचा दिवस, आतला आवाज, अनुभवांती, प्रियजन हे ललित साहित्य, तसंच चैत्रपालवी खडकचाफा, सुखस्वप्न, कांचनबहार या कथासंग्रहांतून शिरीष पै यांच्या लेखन सामर्थ्याची कल्पना करुन देते.
त्यांच्या निधनानं मराठी साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.