मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबला तर खटारा, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. लोकपालनंतर लोकायुक्त कायद्यासाठी मी या सरकारमधील अनेक मंत्र्यांना पत्रं लिहिली मात्र, मुख्यमंत्री सोडता कुणाचेही उत्तर आले नसल्याचं अण्णा हजारे म्हणाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज माझा कट्टा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या पुढच्या वाटचालीबद्दल माहिती दिली.


ठाकरे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबला तर खटारा, अशा प्रकारचा कारभार चालला असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. लोकपालनंतर लोकायुक्त कायदा तयार करायचा आहे. या कायद्याचा मसुदाही तयार करण्यात आला आहे. यासाठी मी राज्य सरकार मधील अनेक मंत्र्यांना पत्रं लिहिली. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोडता कोणाचेही उत्तर आले नाही. कोरोना परिस्थितीनंतर आपण पाहू असे, मुख्यमंत्र्यांनी उत्तर पाठवलं असल्याचे अण्णा म्हणाले. हा कायदा जर आणला नाही तर मी पुन्हा आंदोलन करणार असल्याचेही अण्णांनी सांगितले.


अण्णा हजारे त्यांचं कार्य थांबवणार का?


वयाच्या 25 व्या वर्षी स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांची प्रेरणा घेऊन समाजसेवेचे व्रत मी माझ्या आयुष्यात घेतले आहे. त्यामुळे जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत गाव, समाज आणि देशाची सेवा करायची आहे. त्यामुळे शरीरात प्राण असेपर्यंत हे थांबवता येणार नाही. दसऱ्याला ग्रामसभेत मी नवीन कार्यकर्ते पुढे येत असल्याचे पाहून त्यांच्यावर जबाबदारी टाकणार आहे, असे म्हणालो. मात्र, कार्यातून मुक्त होणार नाही.


आजचं राजकारण म्हणजे पैसा आणि सत्ता


आजचं राजकारण हे ध्येयवादी राहिलेलं नाही. नेत्यांमध्ये दूरदृष्टी राहिली नाही. सामाजिक दृष्टीकोण नाही. आता फक्त सत्ता आणि पैसा यासाठी राजकारण सुरु आहे. लाखो लोकांनी दिलेलं बलिदान हे राजकाणी विसरले आहेत. सध्याच्या राजकारणातून सेवाभावी भाव दूर गेला असल्याची खंत अण्णांनी बोलून दाखवली.



मी गेल्या 40 वर्षांपासून आंदोलन करत आहे. यातून माहितीचा अधिकार, लोकपाल आणि दफ्तर दिरंगाई यासारखे 10 कायदे तयार देशाला दिलेत. माहिती अधिकारातील कलम क्रमांक 4 ची अमलबजाणी सरकार करत नाही. त्यामुळे काही लोक याचा गैरफायदा घेतात. माहिती अधिकारात खूप अधिकार दिलेत. मात्र, सरकार त्यांची अमलबजावणी करत नाही. त्यामुळे काही लोक याचा गैरफायदा घेत असल्याचे अण्णा म्हणाले.


मंदिरावरुन राजकारण सुरु : अण्णा
अधात्माशिवाय माणसात बदल होऊ शकत नाही. अध्यात्म माणसाला बदलू शकतो याच्यावर माझा विश्वास आहे. मात्र, मंदिर उघडताना राजकारण करू नये. बिअरबार उघडले, चित्रपटगृह उघडलीत, रेल्वे सुरु झाली मग मंदिर का उघडली जात नाहीत? असा प्रश्न अण्णांनी सरकारला विचारला आहे.