मुंबई : यंदाच्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात साठ वर्षांवरील आमदारांच्या उपस्थितीबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वयोगटातील सदस्यांना अधिवेशनात उपस्थित राहता येईल का याबाबत सध्या सरकार दरबारी खल सुरु आहे. कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांनुसार साठ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे ज्येष्ठ आमदारांना पावसाळी अधिवेशनात उपस्थित न राहण्याबाबत विनंती करण्याचा विचार सध्या संसदीय कामकाज विभाग आणि विधिमंडळ प्रशासन करत असल्याची माहिती समोर येत आहे.


यासंदर्भात कामकाज सल्लागार समितीला विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींसमोर प्रस्ताव ठेवावा लागेल. यासाठी विधीमंडळ प्रशासनाकडून या वयोगटातील आमदारांची माहिती संकलित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आमदारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची छाननी करुन साठ आणि त्यावरील वयोगटातील यादी सामान्य प्रशासन विभागाला पाठवण्यात आली आहे. यामध्ये विधानसभेतील 289 पैकी 63 आमदारांचा समावेश आहे. तर विधानपरिषदेतील 78 पैकी 18 जागा रिक्त आहेत. त्यामुळे 60 सदस्यांच्या माहितीची छाननी सुरु आहे. मात्र यातून मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांना वगळण्यात येणार येणार आहे.


दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फक्त दोन ते तीन दिवसांचं अधिवेशन घेण्याबाबतचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे कमीत कमी विधिमंडळ सदस्यांच्या उपस्थितीत अधिवेशन घेण्याचा विचार सध्या सुरु आहे. यासाठी सभागृहात सदस्यांच्या किमान गणसंख्येची (कोरमची) अट तात्पुरती शिथील करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करावी लागणार आहे. सभागृहातील नियमित कामकाजासाठी एकूण सदस्य संख्येच्या 1/10 किंवा 10 जी जास्त संख्या असेल इतक्या सदस्यांच्या उपस्थितीचा नियम आहे. उद्या किंवा परवा होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत विरोधी पक्षासह सर्वांच्या सहमतीने याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.


मात्र गेल्या चार महिन्यात अनेक आमदार आणि मंत्र्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यातून ते उपचार घेऊन बरेही झाले आहेत. यामध्ये मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे आणि आता अस्लम शेख यांचा समावेश आहे. तसेच विधीमंडळात आणि मंत्रालयातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या सावटाखाली पावसाळी अधिवेशनाच्या तयारीत अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे यंदाचं अधिवेशन घेण्यासाठी प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधींना तारेवरची कसरत करावी लागत आहे.


कोण आहेत साठीवरील आमदार ?


हरिभाऊ बागडे
कालिदास कोळंबकर
गणेश नाईक
मंदा म्हात्रे
राधाकृष्ण विखे पाटील
गिरीश महाजन
पृथ्वीराज चव्हाण
अबू आझमी
अनिल बाबर
सदा सरवणकर