मुंबई : हाथरस बलात्कार प्रकरण योगी सरकारने अत्यंत बेजाबाबदारपणे, अमानवी पद्धतीने हाताळल्याचं दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणी मुंबईत गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावं, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.


14 सप्टेंबर रोजी हाथरसमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आले. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठत तरुणीची जीभ कापली. एकीकडे पाशवी अत्याचारानंतर तरुणीच्या मृत्यूनंतरही विटंबना सुरुच होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी रात्रीतच कुटुंबीयांना न सांगता तरुणीवर अंत्यसंस्कार केले. यानंतर बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना यूपी पोलिसांनी धक्काबुक्की केली. तर पीडितेच्या कुटुंबाला घरातच डांबून मीडियाशीही बोलू देत नाही. प्रशासनाकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप कुटुंबीय करत आहेत. इतकंच काय वार्तांकनासाठी गेलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना कुटुंबीयांना दिलं जात नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशचं योगी सरकार आणि यूपी पोलीस नेमकं काय लपवत आहेत, असा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांकडून उपस्थित केला जात आहे.


त्याच अनुषंगाने शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी हाथरस प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांना तपासासाठी उत्तर प्रदेशला पाठवावं, अशी मागणी केली. सरनाईक म्हणाले की, "जर सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बिहार पोलीस गुन्हा दाखल करुन मुंबईत येऊ शकतात, मग हाथरस प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन करावा, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे. गृहमंत्र्यांनी ताबडतोब यावर कारवाई करावी, अशी विनंती मी करतो."


प्रताप सरनाईक यांचं ट्वीट
देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबादारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसतेय. मुंबईत यावर गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे अशी विनंती मी गृहमंत्री अनिल देशमुख यांना करतो, असं सरनाईक यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.





14 सप्टेंबर रोजी पाशवी अत्याचार, 29 सप्टेंबरला अखेरचा श्वास
14 सप्टेंबर रोजी हाथरसमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आले. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठत तरुणीची जीभ कापली. यानंतर तिला अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला सोमवारी (28 सप्टेंबर) दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे तिने मंगळवारी सकाळी प्राण सोडले. या प्रकरणातील चार आरोपींना पकडलं असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.