मुंबई : शिवाजी पार्कवर सभा घेतल्यास तेथील लोक कोर्टात जातात. मग आमच्या घरावरुन विमानं जातात, आम्हालाही त्रास होतो, झोप येत नाही, मग विमानं बंद करायची का?, असा सवाल उपस्थित करत शिवसेना आमदार अनिल परब यांनी सरकारला जाब विचारला. ते विधानपरिषदेत बोलत होते.
अनिल परब नेमकं काय म्हणाले?
दादरमधील शिवाजी पार्कात सभा घेतली, तर तिथले लोक कोर्टात जातात. रात्री दहानंतर झोपायचं असतं, काही डेसिबल आवाज होतो म्हणून केस करतात. गेली पाच वर्षे माझ्यावर केस होते आहे, असे आमदार अनिल परब यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “मी मुंबईच्या प्रदूषणाची माहिती घेतली. मुंबईत रात्री दोन वाजता पण सरासरी 72 डेसिबल आवाज होतो. माझ्या घरावरुन दररोज विमानं जातात, दिवसा 138 डेसिबल आवाज होतो, पहाटे तीन वाजता 154 डेसिबल आवाज होतो. मला झोप येत नाही, मला झोपायचं हक्क नाही का? त्याच्याविरोधात मी कोर्टात जातो, तर कोणी याचिका दाखल करुन घेत नाही. याबाबत सरकारने भूमिका घ्यावी.”
तसेच, सभांमुळे ध्वनी प्रदूषण होतं, मग विमानांमुळे होत नाही का? मग विमान पण बंद करा, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.
“मुंबईत पर्यटनस्थळ म्हणून कोणती गोष्ट आहे? आम्ही म्हणून रेसकोर्सला थीम पार्क बनवण्याची आयडिया दिली. आम्ही जागा मागितली, तर तुम्ही मागणी धुडकावून लावली. शिवसेनेला काही द्यायचं नाही, असं ठरलं आहे.”, असा आरोप अनिल परब यांनी सरकारवर केली.
“मुंबई सोन्याची कोंबडी आहे. कोणत्या मुख्यमंत्र्याला मुंबईच प्रेम आहे? कोंबडी कापायची आणि निघून जायचं.”, असेही ते म्हणाले.
शिवतीर्थावरील सभांना आक्षेप घेणाऱ्यांचा अनिल परबांकडून समाचार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Mar 2018 11:06 AM (IST)
“मुंबई सोन्याची कोंबडी आहे. कोणत्या मुख्यमंत्र्याला मुंबईच प्रेम आहे? कोंबडी कापायची आणि निघून जायचं.”, असेही अनिल परब म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -