मुंबई : महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर स्कूल बस असोसिएशनने उद्या स्कूल बस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी मात्र शाळांना सुट्टी देण्यास शिक्षण मंत्री विनो तावडे यांनी नकार दिला आहे. त्यामुळे नियमित वेळेनुसार मुंबईतील शाळा सुरुच राहतील.


स्कूल बस न चालवण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशन घेतलाय. बंदच्या काळात एखादी अनुचित घटना घडू शकते, त्या पार्श्वभूमीवर मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्कूल बस चालवण्यात येणार नसल्याचं स्कूल बस असोसिएशन अध्यक्ष अनिल गर्ग यांनी म्हटलं आहे.

एसटी वाहतूक कडेकोट बंदोबस्तात

पुणे जिल्ह्यातील सणसवाडी येथे झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्या (3 जानेवारी) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. हा बंद शांततेत करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून कडेकोट बंदोबस्तात एसटी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्व विभाग नियंत्रकांनी बसस्थानक, आगार इमारत, नियंत्रण कक्ष, विभागीय कार्यालये, विभागीय कार्यशाळा या सर्व ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त मागवून घ्यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने बस वाहतूक सुरु ठेवावी, असंही म्हटलं आहे.

आंदोलनामुळे वेळोवेळी बदल होणारी माहिती बसस्थानकावर फलकावर प्रदर्शित करावी, असा आदेशही देण्यात आला आहे. जेणेकरुन प्रवाशांची गैरसोय होणार नाही.