नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी येथील 10 गावं स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. मात्र पूर्ण पुनर्वसन होत नाही तोपर्यंत गाव न सोडण्याचा निर्णय प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. विमानतळाची डेडलाईन पुढे जात असल्याने अखेर गावकऱ्यांचं स्थलांतर करण्यासाठी सिडकोने येथील शाळाच बंद केल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून इतर ठिकाणी हलवण्यात आल्याने शाळकरी मुलांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या बांधण्यात आलेली शाळा गावापासून लांब आहेत. तसेच येथे योग्य सुविधा नसल्याने विद्यार्थी दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळेत गेलेलेच नाहीत.
चार गावात अंगणवाडी ते सातवीपर्यंत शाळा आहेत. या शाळेत एकूण 372 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या गावातील शाळा जबरदस्ती बंद करण्यात आल्याने या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
सिडकोने उलवा नोडमध्ये बांधलेल्या नवीन शाळेच्या इमारतीपासून काही अंतरावर विमानतळाचे काम सुरू आहे. तेथील सुरुंग स्फोटामुळे उडालेल्या दगडांमुळे विद्यार्थी जखमी होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी, असे पत्र पोलिसांकडून शिक्षकांना देण्यात आले आहे.
याशिवाय याठिकाणी सुरक्षारक्षकांची व्यवस्था नाही, तसेच धुळीचे साम्राज्य आहे. शाळेत टेबल, खुर्च्या आणि बाक देखील नाहीत. शाळेच्या भिंतीनाही चिरा गेल्या आहेत, तर मुख्य दारांना ग्रीलदेखील नाहीत. यामुळे मुलांना काही झाल्यास, यासाठी कोण जबाबदार असणार असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.