मुंबई : आरे कॉलनीतील जंगलात लागलेल्या आगीमागे बिल्डर, भूमाफियांचे लागेबांधे असल्याचा संशय पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे. रामदास कदम यांनी आज आग लागलेल्या ठिकाणाची पाहणी केली.


रामदास कदम यांनी पाहणीनंतर आरेतील झाडं जळण्याआधी ती तोडली गेली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या घटनेचा पोलीस, महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना सर्व्हे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.


कालच शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहून सीआयडी चौकशीची मागणी केली होती. ही आग लागली की लावली गेली या प्रकरणाची चौकशी, सरकारच्या चौकशी यंत्रणेमार्फत करणे आवश्यक आहे. या आगीची सीआयडीमार्फत चौकशी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना द्याव्यात, अशी विनंती सुनील प्रभूंनी मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे केली आहे.


मनसेच्या शिष्टमंडळानेही काल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली होती. आरे आग प्रकरणी पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी, महसूल विभाग, आरे विभाग, पदुम मंत्री जाणकर यांची बैठक लावणार असल्याचं आश्वासन मुनगंटीवार यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिलं आहे.


सोमवारी संध्याकाळी गोरेगावातील आरेच्या डोंगराला आग लागली होती. आगीमुळे जवळपास 3-4 किमी पट्ट्यातील झाले जळून खाक झाली होती. अग्निशमन दलाच्या 100 जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत, जवळपास 6 तासांनी ही आग विझवली. मात्र जमीन मिळवण्यासाठी जाणुनबुजून ही आग लावण्यात आल्याच आरोप होत आहे.



संबंधित बातम्या


आरे कॉलनीतील आगीची सीआयडी चौकशीची शिवसेनेची मागणी


आग लागली की लावली? वनखात्याने तात्काळ चौकशी करावी : कदम


आरे कॉलनीच्या जंगलातील आगीवर सहा तासांनी नियंत्रण