मुंबई : उद्या संपूर्ण राज्यात इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा नियोजित करण्यात आली आहे. तरी मुंबईतील शाळांमध्ये ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबईतील सर्व शाळांमध्ये अचानक उद्या होणारी शिष्यवृत्ती परीक्षा रद्द केल्याने मोठा गोंधळ पाहायला मिळाला. शिक्षक, विद्यार्थी पालक उद्या शिष्यवृत्ती परिक्षेसाठी पूर्ण तयारी केली असताना मुंबईतील कोरोनाची स्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून आता उद्या होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आतापर्यत 5 ते 6 वेळेस ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती, अखेर उद्या ही परीक्षा राज्यभर घेण्याचा नियोजन होते. त्यात मुंबईसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


काल करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई महापालिकेने आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या आरोग्य हिताचा आणि सुरक्षितेला प्राधान्य देत शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये सुरवातीला फक्त मुंबई महापालिका शाळेत शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. इतर शाळेत परीक्षा नियोजन करावे की नाही? याबाबत शिक्षक, शाळा संभ्रमात होत्या. त्यानंतर आता मुंबईतील सर्व शाळांमध्ये उद्या होणारी शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्यात आल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून परिपत्रकद्वारे काळवण्यात आले आहे. 


परीक्षेबाबतचा विषय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेसमोर ठेवण्यात येईल व या परीक्षेबाबत यथावकाश कळवण्यात येणार आहे. मुंबईतून 24 हजार 472 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये पाचवीचे विद्यार्थी 13 हजार 298, तर आठवीचे विद्यार्थी 11 हजार 174 इतके आहेत. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पालिकेच्या शाळांमधून 8 हजार 825 विद्यार्थी, तर शिक्षण विभागाच्या तिन्ही विभागांशी संलग्न शाळांमधील 15 हजार 647 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आता या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्यात आली आहे. 


इतर बातम्या