नवी दिल्ली : काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांसाठी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. हायकोर्टाने फेरीवाल्यांबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात संजय निरुपम यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.


हायकोर्टाने दिलेला निर्णय स्पष्ट आहे. यामध्येच फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे, असं स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली. फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय त्यांना हटवू नये, अशी याचिका निरुपमांनी केली होती.

मुंबई हायकोर्टाने 1 नोव्हेंबरला काय निर्णय दिला होता?

फेरीवाल्यांवरील कारवाईविरोधात दाद मागणाऱ्या मुंबई  काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना हायकोर्टाने दणका दिला होता. मुंबईत कुठेही फेरीवाल्यांना धंदा करु देण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली होती. शिवाय, मुंबईत फेरीवाल्यांना निर्धारीत फेरीवाला क्षेत्रातच व्यवसाय करण्यास परवानगी हायकोर्टाने दिली.

हायकोर्टाने फेरीवाल्यांना कुठे मनाई केली आहे?

– शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे, हॉस्पिटलच्या 100 मीटरच्या आवारात फेरीवाल्यांना मनाई
– रेल्वे स्टेशन, पालिका मंडईच्या 150 मीटर परिसरात फेरीवाल्यांना मनाई
– रेल्वे पादचारी पुल, स्कय वॉकवर फेरीवाल्यांना मनाई