मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन राज्यभर मोर्चे, आंदोलने सुरु आहेत. दुसरीकडे मात्र निधी (Fund) असूनही लाभार्थी मिळत नसल्याने सारथी (SARTHI) संस्थेचा निधी शिल्लक असल्याचं समोर आलं आहे. योजनांचा प्रचार आणि प्रसार न झाल्यामुळे दरवर्षीच्या मंजूर निधीपैकी अर्धा निधी खर्चाशिवाय शिल्लक आहे.


मराठा समाजाला योजनांचा लाभ मिळावा म्हणून 2018 मध्ये सारथी संस्था स्थापन झाली होती. राज्यभर निघालेल्या मराठा क्रांती मोर्चानंतर मराठा आणि कुणबी मराठा समाजातील तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी 'छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)ची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून 'सारथी' प्रशासनाने तरुणांसाठी विविध योजना राबवण्यास सुरुवात केली. सारथी या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातील (Maratha Community) विद्यार्थ्यांना शैक्षणिक, आर्थिक सुविधा पुरवल्या जातात. यामध्ये वसतिगृह, अभ्यासिका त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिलं जातं. 


कोणत्या वर्षी किती निधी मंजूर आणि किती खर्च झाला?


वर्ष 2020-21 


संस्थेला 130 कोटी मंजूर. त्यापैकी 33 कोटी वितरीत झाले तर खर्च फक्त 26 कोटी रुपये करण्यात आले.


वर्ष 2021-22


295 कोटी मंजूर झाले. सर्व निधी वितरीत झाला, मात्र फक्त 73 कोटी रुपये खर्च करण्यात आला


वर्ष 2022-23


300 कोटी रुपये मंजूर झाले. मागील वर्षाचे 221 कोटी शिल्लक होते. खर्च मात्र फक्त 44 कोटी करण्यात आला


अर्ज जास्त मात्र पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या कमी


यावर्षी पुन्हा 300 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. वर्ष 2022-23 पर्यंत सारथीचे लाभधारक 1 लाख 33 हजार 236 जण होते. अर्ज मोठ्या प्रमाणावर प्राप्त होतात. मात्र लाभार्थी पात्र होत नसल्याने लाभार्थ्यांची संख्या वाढत नसल्याची माहिती विभागाने दिली आहे. 


मराठा समाजाच्या नाराजीनंतर सारथीला स्वायत्तता बहाल


दरम्यान मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'सारथी' संस्थेची स्वायत्तता 21 नोव्हेंबर 2019 रोजी काढून घेण्यात आली होती. त्यामुळे मराठी समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाचा इशाराही दिला होता. आता गरज प्रत्यक्ष कृतीची अन्यथा पुन्हा संघर्ष अटळ आहे, असे मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केले होते. आता राज्य सरकारने ऑक्टोबर 2020 रोजी पुन्हा 'सारथी'ला स्वायत्तता बहाल करण्यात आली. त्यानंतर मराठा समाजाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आलं होतं. 


हेही वाचा


विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या संख्येमध्ये मोठी घट, बार्टीकडून 861 ऐवजी 200 तर सारथीच्या 600 ऐवजी 50 मुलांनाच शिष्यवृत्ती