Sanjay Raut LIVE : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दहिसरमधील सभेत बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांची थेट नावं घेत आरोप केले आहेत. यात सर्वात मोठा गौप्यस्फोट केलाय तो प्रताप सरनाईक आणि यशवंत जाधव यांच्याबाबत. संजय राऊत म्हणाले की, मी प्रताप सरनाईकांना फोन केला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टात केस आहे म्हणून आलो आहे. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी मला फोन करुन सांगितलं की, 'देवेंद्र फडवणीस मला भेटले इथं. ते मला अमित शाहांकडे घेऊन गेले आणि माझं ईडीचं मॅटर क्लियर साफ झालं. त्यामुळं मी आता सूरतला जात आहे, असं सरनाईकांनी मला सांगितलं. राऊत म्हणाले, अशी कोणती वॉशिंग मशीन होती की इतकी मोठी हजारो कोटींची भ्रष्टाचाराची केस अशी टाकली आणि स्वच्छ झाली.', अशा शब्दात संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नीवर देखील किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. मात्र ते दोघेही दिल्लीला गेले आणि त्यांनाही वॉशिंग मशीनमध्ये टाकलं आणि ते स्वच्छ झाले. ते सूरतवरुन थेट गुवाहाटीला गेले. काय वॉशिंग मशीन आहे. हा कोणता ब्रँड आहे. ईडीची कारवाई माझ्यावरही झाले. माझं घर जप्त केलं. माझी वडिलोपार्जित जमीन जप्त केली. मी तरीही गुडघे टेकले नाहीत. ज्या दिवशी माझ्या घरावर रेड पडल्या त्यावेळी मी दिल्लीत होतं. मी रात्री 12 वाजता फोन करुन अमित शाहांना सांगितलं की, माझ्यासाठी माझ्या आसपासच्या लोकांना त्रास देऊ नका. हिंमत असेल तर मला अटक करा. अजूनही मला अटक करण्याचे प्रयत्न आहेत, असंही ते म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, मी बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतो, झुकेंगे नहीं. मला अनेक लोकं सांगतात की तुम्ही सकाळी चालायला जाता, ते जाऊ नका. तुमच्यावर लक्ष आहे. मी म्हटलं काय करतील हरेन पंड्यासारखी गोळी घालतील मला. वाघाचं काळीज आहे माझं. शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं असं नाही माझं गुलाबराव पाटील आणि संदिपान भुमरे यांच्यासारख्या. शिवसेना अखंड आहे, फिनिक्स पक्षाप्रमाणं पुन्हा पुन्हा झेप घेईल, असंही राऊत म्हणाले.
मनपा निवडणुकीत जर आपण प्रचंड बहुमताने जिंकलो तर हे गुवाहाटीत बसलेले 40 चोर कायमचे मातीत जातील आणि शिवसेनेतील कीड कायमची नष्ट होईल, असं ते म्हणाले. यांना पक्षानं काय दिलं नाही. अनेकांवर अन्याय करुन यांना भरभरुन दिलंय. मात्र आता असं होणार नाही. आता फक्त शिवसैनिक आणि शिवसैनिकांनाच मिळणार, असं ते म्हणाले.
काल रात्री म्हणे एकनाथांचे कपडे फाडले. त्यांनी सकाळी दुकानं लवकर उघडून चड्डी बनियन आणायला सांगितली. ही आता चड्डी बनियान टोळी झाली आहे, असा हल्लाबोलही संजय राऊतांनी केला.