मुंबई : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी रेल्वे सोडण्यावरुन केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि राज्य सरकारमध्ये ट्विटरवार सुरू झालं आहे. याची सुरुवात आज केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या ट्विटने झाली आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्त्युत्तर दिलंय. त्यावर संजय राऊत यांनी देखील रेल्वेमंत्र्यांना ट्विट करत टोला लगावला आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी हव्या तितक्या ट्रेन्स केंद्र सरकारकडून मिळत नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलं होतं. त्यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आक्रमक भूमिका घेत, महाराष्ट्रासाठी रोज 125 ट्रेन सोडण्यासाठी रेल्वे तयार आहे. रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांची यादी द्या, असं पियुष गोयल यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.


काय म्हणाले पियुष गोयल?
उद्धवजी आशा आहे तुम्ही ठीक असाल. तुमच्या स्वास्थ्यासाठी शुभेच्छा. महाराष्ट्राला उद्यापासून रोज 125 श्रमिक स्पेशल ट्रेन देण्याची रेल्वेची तयारी आहे. महाराष्ट्रातील मजुरांची यादी तुमच्याकडे असल्याचं तुम्ही सांगितलं. तुम्ही ती यादी कृपया रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे एका तासाच्या आत सादर करावी. यासोबतच ट्रेन कुठून सोडायची आहे, प्रवाशांनुसार ट्रेनची संख्या, त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र ही सर्व माहितीही द्यावी. यानुसार ट्रेन सोडण्याचे नियोजन आम्हाला करता येईल, असं पियुष गोयल म्हणाले. आशा आहे, ट्रेन स्टेशनवर आल्यावर आधीसारख्या रिकाम्या जाणार नाहीत. तुम्हाला जितक्या ट्रेन हव्या आहेत तेवढ्या उपलब्ध करून दिल्या जातील, असं गोयल यांनी म्हटलं.







काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
राज्यातील परिस्थिती राजकारण करण्याची नाही. त्यामुळे माझ्याकडूनही राजकारण होणार नाही, पण नेत्यांनी राजकारण करू नये, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज म्हटलं. यावर सूचनांना राजकारण समजायचे असेल, तर त्यांनी त्याच गैरसमजात रहावे, असं प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांनी दिलं. सोबतचं उद्धव ठाकरेंनी जेवढ्या ट्रेन्स मागितल्या, त्या सर्व दिल्या. अगदी रात्री उशीरा ही लिस्ट आली तरी मजुरांना ट्रेन्स उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे उद्धव ठाकरे ह्यांचे वक्तव्य हे निव्वळ राजकारण आहे. स्वत:चे अपयश लपवण्यासाठी वारंवार केंद्र सरकारवर खापर फोडणे, याला काय म्हणायचे? केंद्र सरकार आजही सर्व ती मदत देण्यास तत्पर आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.





खासदार संजय राऊत काय म्हणाले?
महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना फक्त एक विनंती आहे की ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचु नये.


CM Uddhav Thackrey | 31 मे नंतर लॉकडाऊनचं काय होणार? पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले