मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरुन राजकारण तापलं आहे. या भेटीविषयी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'सामना'तील मुलाखत घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र यावेळी बिहार निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं. तसंत फडणवीस यांची मुलाखत अन एडिटेडच असेल, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. याशिवाय भाजपचे प्रदेशाक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी शेलक्या शब्दात भाष्य केलं.


दरम्यान फडणवीस यांच्यासोबतच्या मुलाखतीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. ती ठरवण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा भेटू, असंही संजय राऊत नमूद केलं.


संजय राऊत म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते आहेत. राष्ट्रीय स्तरावरही त्यांचं नावलौकिक होत आहे. तरुण नेत्याला आपली मतं मांडता येतील. देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत नक्कीच घेणार आहे. याआधी शरद पवार यांचीही मुलाखत घेतली होती. भविष्यात राहुल गांधी, अमित शाह यांचीही मुलाखत घेणार आहे."


फडणवीसांची मुलाखत अनकटच असणार


"मी फ्रीडम ऑफ स्पीच मानणारा व्यक्ती आहे. 'सामना'च्या सर्व मुलाखती अन एडिटेडच असतात. फडणवीस यांची मुलाखतही 'अन एडिटेड असेल. देवेंद्र फडणवीस जे बोलतील ते सगळ्यांसमोर असेल, मग आमच्यावर टीका असो किंवा इतर काही, मुलाखत अनकटच असणार," असंही संजय राऊत यांनी सांगितलं.


मध्यावधी निवडणुकीबाबत चंद्रकांत पाटलांच्या भूमिकेकडे सरात्मक पद्धतीने पाहतो


महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. यावर चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेकडे मी सकारात्मक पद्धतीने पाहतो. निवडणुकीबाबत बोलण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. त्यांना पाटील यांना ती जबाबदारी मिळाली असेल तर उत्तम आहे, अशा शेलक्या शब्दात राऊत यांनी भाष्य केलं. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार पाच वर्ष टिकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


'दात उचकटणाऱ्यांचे दात घशात जातील'


सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात भाजप नेत्यांकडून राज्याचे पर्यटन मंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करण्यात आला होता. यावर "ज्यांनी ज्यांनी या प्रकरणात दात उचकटले होते, त्यांचे दात लवकरच घशात जातील याची मला खात्री आहे," अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला. ते पुढे म्हणाले की, "शिवसेनेच्या केसालाही धक्का लागला नाही. ज्यांच्यावर आरोप झाले ते पक्षाचे प्रमुख नेते आहे. त्यांच्यावर चिखलफेक केली तरी काही झालं नाही. आता आम्ही सीबीआयच्या अहवालाची वाट पाहतोय."


Sanjay Raut PC | देवेंद्र फडणवीस यांची 'सामना'तील मुलाखत 'अन एडिटेड'च असेल : संजय राऊत