मुंबई : "राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे संबंध मधुर आहेत. दोघांना एकमेकांविषयी आदर आणि आहे. दोघांचे संबंध पिता-पुत्रासारखे आहेत," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. संजय राऊत यांनी आज राजभवनात जाऊन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. जवळपास 20 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं संजय राऊत म्हणाले.


गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत सातत्याने राज्यपालांवर निशाणा साधत आहेत. त्यातच विरोधक आणि राज्यपालांच्या सतत होणाऱ्या भेटीवरुन 'राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये', अशी टीकाही त्यांनी केली होती. त्यानंतर आज संजय राऊत राजभवनावर पोहोचल्याने सगळ्यांच्याच नजरा या भेटीकडे लागल्या होत्या. परंतु ही सदिच्छा भेट असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.


संजय राज्यपालांच्या भेटीविषयी संजय राऊत म्हणाले की, "राज्यपाल आमचे मार्गदर्शक आहेत. खूप दिवस त्यांना मी व्यक्तिश: भेटलो नव्हतो. ही केवळ सदिच्छा भेट होती. यापलिकडे काही नाही. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध अत्यंत मधुर आहेत. दोघांना एकमेकांविषयी प्रेम आणि आदर आहे. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचे संबंध जसे पिता-पुत्राचे असावेत तसेच आहेत. दऱ्या वगैरे आमच्यात पडत नाही."


राज्यपाल अचानक प्रिय कसे झाले या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, "राज्यपाल प्रियच असतात ते या राज्याचे पालक आहेत, घटनात्मक प्रमुख आहेत. विरोधक सतत इथे येतात त्यामुळे विरोधी पक्षनेत्याचं दालन किंवा बंगला राजभवन परिसरात असावं, असं अनेकांनी सांगितलं, याचा अर्थ ती राजभवनावर टीका होत नाही.


सरकारच्या कामाची इत्यंभूत माहिती राज्यपालांना आहे
तसंच कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याची आरोप विरोधक सतत करत आहेत. याबाबत विरोक्षी पक्षाचे सातत्याने राज्यपालांची भेट घेत आहेत. याबाबत संजय राऊत म्हणाले की, "विरोधी पक्ष एका बेटावर आहे, त्यांना काही दिसत नाही. सरकार काय करतंय याची इत्यंभूत माहिती सरकार राज्यपालांना देत असतं आणि त्यांना माहित आहे."


विद्यापीठाचे कुलपती नात्याने राज्यपालांनी भूमिका व्यक्त केली
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेविषयी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी युजीसीला पाठवलेल्या पत्राबाबत राज्यपालांनी आक्षेप घेतला. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, "उदय सामंत यांनी मत व्यक्त केलं, निर्णय घेतलेला नाही.राज्यपाल विद्यापीठाचे कुलपती आहेत, त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली. त्याबाबत सरकार आणि संबंधित मंत्री निर्णय घेतील."


Sanjay Raut | राज्यपाल मुख्यमंत्री हे पिता-पुत्रासारखे; संजय राऊत यांची प्रतिक्रिया