मंत्रालयात विष प्राशन केलेले 84 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली आहे. पाटील यांनी काल (रविवारी) रात्री जे जे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं. त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जेजे रुग्णालयात 84 वर्षाच्या धर्मा पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला. या संपूर्ण प्रकरणावरुन संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
‘राज्य सरकारला कलंक लावणारा प्रकार’
‘राज्य सरकारला हा कलंक लावणारा प्रकार आहे. शेतकऱ्यांच्या आक्रोशानेही सरकारला ऐकू येत नाही. विकास हवा आहे पण शेतकऱ्यांचे मृत्यू जर मंत्रालयाच्या दारात होत असतील तर असा विकास नको.’ असंही ते यावेळी म्हणाले.
‘एजंटगिरी रोखण्यात सरकार असमर्थ’
‘३ वर्षात ३ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत, एजंटगिरी रोखण्यात सरकार असमर्थ ठरलं आहे.’ अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यात रहिवाशी. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली.
धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला.
इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरु केला. मात्र, त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केलं.
धर्मा पाटलांच्या विषप्राशनानंतर जाग आलेल्या सरकारनं पाटील यांच्या कुटुंबीयांना 15 लाखाचं सामुग्रह अनुदान देऊ केलं. मात्र अनुदान नको, आम्हाला मोबदला द्या, अशी मागणी लावून पाटील कुटुंबाने धरली आहे.
संबंधित बातम्या :
LIVE: सरकारकडून नरेंद्र पाटील यांना लेखी आश्वासन
भाजप सरकार हे कडेलोट करण्याच्या लायकीचं: राजू शेट्टी
धर्मा पाटील यांना शहीद भूमीपुत्र शेतकऱ्याचा दर्जा द्या : नरेंद्र पाटील
अखेर झुंज अपयशी, धर्मा पाटील यांचं निधन