BMC Covid Scam Case: संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. BMC कोविड घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई केली आहे. तसेच, याप्रकरणी डॉ. किशोर बिसुरे यांनाही ईडीनं अटक केली आहे. कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मुंबईत अनेक ठिकाणी जम्बो कोविड सेंटर्स उभारण्यात आले होते. त्यावेळी मुंबई महापालिकेकडून कोविड सेंटर्सचे कॉन्ट्रॅक्ट पात्रता नसलेल्या लोकांना देण्यात आले होते. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला होता. तसेच, जेवढ्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट्स देण्यात आले आहेत. त्या कोणत्याही कंपन्या अनुभवी नव्हत्या. तसेच, त्या कोवि़च्या काही काळापूर्वीच स्थापन झाल्या होत्या. अनेक नियम डावलून या कंपन्यांना महापालिकेच्या वतीनं कॉन्ट्रॅक्ट्स देण्यात आले होते. 


कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात ईडीनं अटक केलेल्या सुजित पाटकर आणि डॉ. किशोर बिसुरे यांना मुंबई सत्र न्यायालयात रिमांडसाठी हजर केलं जाणार आहे. दोघांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना ईडी कार्यालयात आणण्यात आलं आहे. तिथंच त्यांच्या रिमांडची कागदपत्रं बनवली जात आहेत. कोर्टाच्या दुपारच्या सत्रात त्यांना रिमांडसाठी हजर केलं जाईल. 


काय आहेत ईडीचे आरोप? 


बीएमसीच्या जंबो कोविड-19 केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचा आरोप ईडीनं केला आहे.  कोविड सेंटरचं कंत्राट घेतलेल्या लाईफलाईन कंपनीनं पेपर्सवर दाखवलेले डॉक्टर्स आता अस्तित्वातच नव्हते, असं ईडी चौकशीतून समोर आल्याची माहिती मिळत आहे. . बीएमसीच्या जंबो कोविड-19 केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचाही आरोप ईडीनं केला आहे. 


एकीकडे कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीची चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे आता एसआयटी देखील अॅक्शनमोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कोरोना काळात भ्रष्टाचाराचा आरोप होत असताना यामध्ये एसआयटी चौकशीमध्ये आणखी कोणती माहिती मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर नेमके कोण? 


बीएमसी कोविड घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी आरोप केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं होतं. आज याप्रकरणी ईडीनं मुंबईत तब्बल 15 ठिकाणी छापेमारी केली होती. या आरोपांना संजय राऊत यांनी ते माझे फक्त मित्र असल्याचं म्हटलं होतं. ईडीच्या चौकशीत सुजीत पाटकरांच्या घरी अलिबागच्या जमिनीच्या व्यवहाराचे पेपर मिळाले होते. ज्या व्यवहारात पाटकरांची पत्नी आणि वर्षा राऊतांची नावं होती. लाईफसायन्सेस हॉस्पिटल अँड मॅनेजमेंट या फर्ममध्ये मी भागीदारांपैकी एक आहे. परंतु कंपनी डॉ. हेमंत गुप्ता यांच्या मालकीची आहे आणि वरळी येथील त्यांच्या क्लिनिकच्या नावावर ती नोंदणीकृत आहे, असं सुजित पाटकर म्हणाले होते.


किरीट सोमय्यांनी काय आरोप केले? 


भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठा गौप्यस्फोट करत कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. शिवसेना खासदार संजय राऊत हे भागिदार असलेली लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस ही कंपनी अस्तित्वातच नाही. तरीही कोविड सेंटरचं कंत्राट या कंपनीला देऊन तब्बल शंभर कोटींचा जम्बो कोविड घेटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी एक ट्वीट करत काही गोष्टी मांडल्या होत्या. 


किरीट सोमय्या ट्वीटमध्ये म्हणाले होते की, "शिवसेना खासदार संजय राऊत यांची भागिदारी असलेली सुजीत पाटकर यांची बनावट कंपनी आहे. लाइफलाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस ही कंपनीच अस्तित्वातच नाही. परंतु, या कंपनीला दहिसर, वरळी NSCI, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड आणि पुण्यातील कोविड सेंटरचे कंत्राट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. या कोविड सेंटरमध्ये अनेक कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून या कंपनीने शंभर कोटी रूपयांचा जम्बो कोविड घोटाळा केला आहे.", असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच, त्यांनी या घोटाळ्याची चौकशी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ऑथरिटीनं  (NDMA) करावी, अशी मागणी केली होती.