मुंबई : फेरीवाले जिथे कमजोर असतील तिथे तुमची दादागिरी चालेल. मात्र जिथे फेरीवाले मजबूत असतील तर तिथे मनसेला मार खावाच लागेल, असा स्पष्ट इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिला आहे.


मालाड येथे मनसे कार्यकर्ते आणि फेरीवाल्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांचा बचाव केला. फेरीवाल्यांनी आपल्या स्वसंरक्षणासाठी प्रतिकार केला त्यात चूक नाही. मनसेची गुंडगर्दी शहरातून हटवलीच पाहिजे. त्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे, असंही संजय निरुपम म्हणाले.

काही दिवसांपूर्वी भाजपचे एक आमदार फेरीवाल्यांना मारहाण करताना आढळले. आम्ही त्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. मनसेचे कार्यकर्ते गेले अनेक दिवस मुंबई आणि आसपासच्या उपनगरांत मारहाण करतात आणि गुन्हा दाखल होत नाही. मनसे अध्यक्ष परवानगीशिवाय मोर्चा काढतात, तरीही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होत नाही. पण मी फेरीवाल्यांसोबत बैठक घेतली तरीही माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असा आरोप संजय निरुपम यांनी केला.

''हफ्तेखोरीत मनसेचाही सहभाग''

जगभरात अनेक महत्वाच्या ठिकाणी फेरीवाल्यांना पाहिलं आहे. ही फक्त मुंबईपुरती समस्या नाही. सिव्हिल सोसायटीच्या लोकांनी फेरीवाल्यांऐवजी बीएमसीला नावं ठेवावीत, त्यांनी ही समस्या वाढवली आहे. गेली अनेक वर्षे महापालिका आयुक्तांना अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येबाबत चर्चा करत आहे. त्यांना लायसन्स द्या आणि ही समस्या सोडवा, अशी मागणी करत आहे. पण मुख्यमंत्री आणि आयुक्त काहीच करत नाहीत. हे सगळं होत नाही, कारण या सगळ्या रॅकेटमध्ये हफ्तेखोरी आहे, ज्यामधे मनसेचेही नेते आहेत, असा आरोपही संजय निरुपम यांनी केला.

''मारामारीत काँग्रेसचा सहभाग नव्हता''

मालाडमध्ये 1964 पासून जे फेरीवाले तिथे भाजी मार्केट लावतात त्यांना मनसेवाले हटवायला आले. अखेर सगळ्या संघर्षाचं रूपांतर मारामारीत झालं. जिथे फेरीवाले कमजोर असतील तिथे तुमची दादागिरी चालेल. मात्र जिथे फेरीवाले मजबूत असतील तिथे मनसेला मार खावाच लागेल. भाजपच्या जुहूच्या आमदारांनीही फेरीवाल्यांना मारहाण केली. मालाडमध्ये जो प्रकार झाला, त्यात काँग्रेसच्या एकाही कार्यकर्त्याचा समावेश नव्हता, असा दावा संजय निरुपम यांनी केला.

''नितेश राणेंना टोला''

दरम्यान संजय निरुपम यांनी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनाही टोला लगावला. नितेश राणे सध्या कोणत्या पक्षात आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. असंही लहान मुलांच्या बोलण्यावर मी उगाच कशाला काय बोलावं, असा टोला त्यांनी लगावला.

संजय निरुपम यांच्याविरोधात गुन्हा दाखल

विनापरवागी सभा घेऊन लोकांना कायदा हातात घेण्याचं आवाहन करणाऱ्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी निरुपम यांच्या भडकाऊ भाषणाचं व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं आहे. काल संध्याकाळी मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसे विभाग अध्यक्षांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं कळतं आहे. संजय निरुपमांनी हल्लेखोर फेरीवाल्यांनी चिथावल्याचा आरोप मनसेतर्फे करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आज त्याची दखल घेत संजय निरुपम यांच्यावर गुन्हा दाखल केला.

सात फेरीवाल्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

मुंबईतल्या मालाड भागात मनसे कार्यकर्त्याला झालेल्या मारहाण प्रकरणी 7 फेरीवाल्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. काल मालाडमध्ये मनसे कार्यकर्ते सुशांत माळवदे यांना काही फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली.

काय आहे प्रकरण?

मालाडमध्ये फेरीवाल्यांच्या मारहाणीत जखमी झालेले मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना उपचारासाठी कांदिवलीच्या ऑस्कर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

काल मालाडमध्ये फेरीवाल्यांनी सुशांत माळवदे यांना जबर मारहाण केली होती. या संपूर्ण प्रकरणाला संजय निरुपम जबाबदार असल्याचा आरोप केला जातो आहे. काँग्रेसच्या संजय निरुपमांनी फेरीवाल्यांना चिथावणी दिल्याचा आरोप मनसेनं केला आहे.

संबंधित बातम्या :

जैसी करनी, वैसी भरनी, संजय निरुपम यांचं मनसेला प्रत्युत्तर

नितेश राणेंचा मराठी ‘स्वाभिमान’ जागा, मनसेला पाठिंबा

फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला, आतापर्यंत काय काय झालं?

मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

दादरमध्ये मनसेकडून फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड

मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला