राहुल गांधी निर्बुद्ध, तर पी. चिदंबरम देशद्रोही : सुब्रमण्यम स्वामी
एबीपी माझा वेब टीम | 29 Oct 2017 04:00 PM (IST)
राज ठाकरे आणि उत्तर भारतीयांचा डीएनए एकच असल्याचा पलटवारही त्यांनी केला.
डोंबिवली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अजूनही निर्बुद्ध आहेत, तर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे देशद्रोही आहेत, अशा शब्दात राज्यसभा खासदार आणि भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी टीका केली. सुब्रमण्यम स्वामी हे डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी ते बोलत होते. काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्याची पी. चिदंबरम यांची मागणी स्वामींनी धुडकावून लावली. काश्मीरला स्वायत्तता देण्याची पी. चिदंबरम यांची मागणी देशद्रोही असल्याचं सांगत लवकरच चिदंबरम यांची रवानगी जेलमध्ये होणार असल्याचा घणाघात त्यांनी केला. राहुल गांधींवरही त्यांनी हल्लाबोल केला. शिवसेना आणि मनसे राहुल गांधींचं गुणगाण गात असली, तरी तो त्यांचा प्रश्न आहे. माझ्या लेखी राहुल गांधी निर्बृद्ध आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला. मशिदीत फक्त नमाज पढतात, जो कुठेही पठण केला जाऊ शकतो, मात्र राममंदिर हे रामजन्मभूमीतच उभं राहणार असा दावा त्यांनी केला. शिवाय, याबाबत न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यात आपणच जिंकू. मात्र त्यापूर्वी श्री श्री श्री रविशंकर मध्यस्थी करून तोडगा काढणार असतील, तर त्याचं स्वागतच असेल, असं स्वामी म्हणाले. राज ठाकरे यांनी काल डोंबिवलीत गुजरात निवडणुकीत भाजपा निवडून आली, तर ते इव्हीएम मशीनचं यश असेल, असं म्हणाले होते. त्यांना उत्तर देताना मशीनमध्ये घोळ करणं शक्य नसल्याचं स्वामी म्हणाले. शिवाय राज ठाकरे आणि उत्तर भारतीयांचा डीएनए एकच असल्याचा पलटवारही त्यांनी केला.