मुंबई : मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचं काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी समर्थन केले आहे. "जैसी करनी, वैसी भरनी", असे म्हणत संजय निरुपम यांनी मनसेला प्रत्युत्तर दिले आहे.
"काय कायदेशीर आणि काय बेकायदेशीर, हे ठरवण्याचा मनसेला अधिकार नाही. ज्यावेळी फेरीवाल्यांना मारहाण होत होती, त्यावेळी पोलीस गप्प बसले होते. यापुढेही फेरीवाले असेच करतील.", असे संजय निरुपम म्हणाले.
शिवसेनेला संपवण्यासाठी भाजप मनसेला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला.
त्याचसोबत, मनसेचे जखमी कार्यकर्ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो, असेही निरुपम म्हणाले.
"आता विनंती नव्हे, युद्ध होईल. संघर्ष अत्यंत भीषण होईल आणि संघर्ष व्हायलाच हवा. उत्तर देण्याचा अधिकार फेरावाल्यांनाही आहे.", असे निरुपम म्हणाले. शिवाय, "2014 साली बनलेला फेरीवाला संरक्षण कायदा लागू व्हायला हवा. मात्र अनेक जणांना वाटतं की, तो कायदा लागू होऊ नये. मुख्यमंत्र्यांनी बांगड्या भरल्यात आणि सरकार झोपलं आहे.", असा घणाघातही संजय निरुपम यांनी केला.
काय आहे प्रकरण?
मालाडमध्ये फेरीवाल्यांच्या मारहाणीत जखमी झालेले मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना उपचारासाठी कांदिवलीच्या ऑस्कर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
काल मालाडमध्ये फेरीवाल्यांनी सुशांत माळवदे यांना जबर मारहाण केली होती. या संपूर्ण प्रकरणाला संजय निरुपम जबाबदार असल्याचा आरोप केला जातो आहे. काँग्रेसच्या संजय निरुपमांनी फेरीवाल्यांना चिथावणी दिल्याचा आरोप मनसेनं केला आहे.
संबंधित बातम्या :
नितेश राणेंचा मराठी 'स्वाभिमान' जागा, मनसेला पाठिंबा
फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला, आतापर्यंत काय काय झालं?
मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात
दादरमध्ये मनसेकडून फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड
मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला