कल्याण : चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची शाळेबाहेर निर्घृण हत्या केल्याची घटना कल्याणजवळच्या मुरबाड तालुक्यात घडली आहे. सुरज ज्ञानेश्वर भोईर असं मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांचं नाव आहे.


मुरबाड तालुक्यातल्या नांदेणी गावात राहणारा सुरज गावातल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होता. आज सकाळी शाळा सुरु असताना लघुशंकेसाठी म्हणून तो बाहेर पडला, मात्र बराच वेळ परतलाच नाही. त्यामुळे शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांनी त्याचा शोध घेतला असता शाळेच्या बाजूला एका बांधकाम सुरू असलेल्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला.

सूरजच्या डोक्यावर आणि गळ्यावर कोयत्याने वार केले होते. त्याची हत्या कुणी आणि का केली? याबाबत अद्याप कुठलीही माहिती पोलिसांनी दिलेली नाही.

मात्र याप्रकरणी सुरजच्या सख्ख्या काकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काकाच्या अनैतिक संबंधांची माहिती सुरजला मिळाल्याने काकाने त्याची हत्या केल्याची चर्चा गावात आहे.