मुंबई : मुंबई सेन्ट्रलच्या ऑर्किड टॉवरमध्ये उद्याच्या बकरी ईदची लगबग पाहायला मिळत आहे. मुस्लीम बांधव बकऱ्याचे बळी देऊन आणि मोठी दावत ठेऊन हा 'कुर्बाणी सण' मोठ्या जल्लोषात साजरा करतात. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती पाहता यंदाच्या कुर्बाणीत काटकसर करून या पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा नेक निर्णय येथील मुस्लीम बांधवांनी घेतला आहे.


याशिवाय 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकांच्या घरोघरी जाऊन भारतीय म्हणून आपल्या पूरग्रस्त देशबांधवांच्या मदतीसाठी पुढे यावं, असं आवाहन यांच्याकडून करण्यात येणार आहे.


एका बकऱ्याची किंमत 15 ते 20 हजारांच्या घरात असते. त्याची कुर्बाणी देऊन मोठ्या दावती ठेवल्या जातात. यावर लाखोंचा खर्च केला जातो. मात्र त्याऐवजी काटकसर करुन आम्ही एका पूरग्रस्त कुटुंबियाची जरी मदत करु शकलो तर खऱ्या अर्थाने आम्ही मानवतेच्या धर्माचं पालन करु, अशी भावना त्यांनी व्यक्त केल्या.


सध्या सण साजरा करण्यापेक्षा पूरग्रस्त लोकांना औषधे, गरम कपडे, सुखा मेवा अशा मदत साहित्यांच्या पुरवठा करण्याचा निर्धार येथील मुस्लीम बांधवांनी केला आहे. त्यामुळे धर्म, जात, भाषा, प्रांत या आधारावर कितीही ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला तरी संकटाच्या काळात माणूसच माणसाच्या मदतीला धावून येतो, याचं उत्तम उदाहरणच या सगळ्यांनी आपल्या समोर ठेवलं आहे.