शेतकऱ्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा घेऊन सांगलीचा शेतकरी ‘मातोश्री’वर!
एबीपी माझा वेब टीम | 04 Apr 2017 03:15 PM (IST)
मुंबई: सांगलीचा एक शेतकरी शेतकऱ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा घेऊन मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर दाखल झाला आहे. विजय जाधव असं या शेतकऱ्याचं नाव आहे. ‘मातोश्री’च नव्हे तर प्रत्येक राजकीय पुढाऱ्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानावर आपण ही अंत्ययात्रा काढणार असल्याचा निर्धार विजय जाधव यांनी बोलून दाखवला. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, बैलगाडा शर्यती सुरु करण्याच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची त्यांची मागणी आहे. उद्या मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानाबाहेर या प्रतिकात्मक अंत्ययात्रेची सांगता होणार आहे. मात्र, मागण्या पूर्ण न झाल्यास त्याच ठिकाणी प्रतिकात्मक अंत्यसंस्कार करणार असल्याचं विजय जाधव यांनी म्हटलं आहे.