मुंबई : विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासोबतच मुंबईतील वांद्र्याच्या एका शाळेने पालकांनाही ड्रेस कोड जारी केला आहे. शाळेत होणाऱ्या पालकसभेत पालकांनी कोणते कपडे घालावेत, याचे नियम शाळेने बनवले आहेत.
पालकांनी साधे आणि शालीन कपडे परिधान करुन पालकसभेत यायला हवं, असं शाळेतर्फे सांगण्यात आलं आहे.
वांद्र्यातील रिझवी स्प्रिंगफील्ड हायस्कूलने हे नियम बनवले आहेत. नववी इयत्तेच्या विद्यार्थ्यांचे पालक 30 मार्च रोजी प्रगतीपुस्तक घेण्यासाठी शाळेत पोहोचले, त्यावेळी त्यांना नियमावलीची यादीच सोपवण्यात आली होती.
यावर पालकांनी स्वाक्षरी करावी, अशी शाळेची अपेक्षा होती. 'मी शाळेत साधे आणि शालीन कपडे घालून येईन. जर तसं केलं नाही तर परिणामांसाठी मी स्वत:च जबाबदार असेन, असं या नियमावलीत लिहिलं आहे.
एवढंच नाही तर मीटिंगदरम्यान पालकांनी आपापले मोबाईल रिसेप्शनवर ठेवावेत. तसंच स्टाफला अकारण कोणतेही प्रश्न विचारु नये आणि त्यांच्यासोबत बोलताना भाषा योग्य असावी, असंही सांगितलं आहे.
दरम्यान, शाळेचा हा फतवा अनेक पालकांना आवडला नाही. पालकांनी काय घालावं किंवा काय घालू नये, मोबाईल वापरावा का, हे आम्हाला शाळेने सांगू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया काही पालकांनी दिली.
तर शाळेचा स्टाफ, फी वाढ आणि व्यवस्थापन याबाबत अनेक तक्रारी आहेत. आमच्यापैकी काही जण त्याचा विरोध करत आहोत. त्यामुळे आमचा आवाज दाबण्यासाठीच ही नियमावली आणल्याचा आरोप पालकांनी केला आहे.