अंबरनाथ : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत आंदोलनं केलं. पण दुसरीकडे नेत्यांच्या स्वागतामुळे शिवसैनिकावर रस्त्यावर येण्याची पाळी आली आहे. संदीप कदम असं या शिवसैनिकाचं नाव असून, आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी पक्षानं तब्बल 3 लाखाचं बिल थकवल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे 2014 साली अंबरनाथ दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कमानी आणि झेंडे लावून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं. याचं काम स्थानिक शिवसेना शाखेनं संदीप कदम यांना दिलं होतं. पण दौरा झाल्यानंतर, याचं तब्बल ३ लाखांचं बिल पक्षानं थकवल्याने, संदीपच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे.
त्यातच बिलासाठी चकरा मारताना संदीपला अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळं मागील वर्षभरापासून तो अंथरुणाला खिळून आहे. त्यामुळं तीन मुलींच्या पालनपोषण, शिक्षणासह घरखर्च भागवण्यासाठी संदीपच्या पत्नीला घरकाम करण्याची वेळ आली आहे.
ज्या जोमानं संदीप कदमांनी आदित्य ठाकरेंच्या स्वागताची तयारी केली. त्याहून जास्त कष्ट त्यांना त्या कामाचे पैसे मिळवण्यासाठी घ्यावे लागले. मात्र 3 वर्षे येरझऱ्या मारुनही संदीप कदमांना फुकटी दमडीही मिळालेली नसल्याचं ते सांगत आहेत.
यासंदर्भात शिवसेनेच्या स्थानिक आमदारांना विचारलं असता त्यांनी संदीप कदमांनाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना मैदानात उतरली, मात्र पक्षानं झिडकारल्यामुळं कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या या शिवसैनिकाचं काय? त्याला कर्जाच्या कचाट्यातून बाहेर काढण्याचे आदेश उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देणार का? की अशाच संकटात जगण्यासाठी या शिवसैनिकाला परिस्थितीच्या हवाली करण्यात येणार, असे प्रश्न उपस्थीत होत आहेत.