मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागल्याचं दिसतंय. शिवसेना ठाकरे गटाने मोर्चेबांधणी सुरु केली असून युतीसाठी देखील चर्चा सुरु आहे. आगामी मुंबई पालिकेसाठी (BMC Election) ठाकरे बंधूंची युती होण्याची शक्यता आहे. अशातच मुंबईचा महापौर कोण होणार यावर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून दावे केले जात आहेत. मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होणार असा विश्वास काही दिवसांपूर्वी ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी व्यक्त केला होता. तर आता मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि मनसेचाच होणार असा विश्वास मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी व्यक्त केला आहे.
Sandeep Deshpande On BMC Elections : महापौर मनसेचा होणार
शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा पदाधिकारी मेळावा रविवारी पार पडला. मेळाव्याच्या ठिकाणी मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होणार असे पोस्टर लावण्यात आले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे म्हणाले की, मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि तो मनसेचाच होणार.
संदीप देशपांडेंच्या या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की," मनसे आणि शिवसेना ठाकरे एकत्र लढणार आहेत. अशा वेळी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये अधिक प्राण फुंकण्यासाठी, त्यांना जिद्दीने लढण्यास तयार करण्यासाठी प्रत्येक पक्षाचा नेता असा विश्वास देतो."
Sanjay Raut On BMC Elections : संजय राऊतांचे भाजपला प्रत्युत्तर
काही दिवसांपूर्वी भाजपच्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, काहीही झाले तरी मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार. त्यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली होती. काहीही झालं तरी मुंबईची महापौर हा मराठीच होणार आणि तो शिवसेनेचाच होणार असं संजय राऊत म्हणाले होते.
BJP Mission For BMC Election : महापौरपदासाठी सत्ताधाऱ्यांमध्येही चढाओढ
मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार यावरून आता चढाओढ सुरू झाली आहे. मुंबईत महायुती विरूद्ध ठाकरेंची शिवसेना आणि मनसे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजू आपापला महापौर मनपावर बसवण्याचा दावा करत आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांमध्येही अंतर्गत चढाओढ असल्याने सामना उत्कंठावर्धक होऊ लागलाय.
Amit Shah On Mumbai Election : अमित शाहांचा संदेश
मुंबई महापालिकेचे वेध अगदी दिल्लीपर्यंत लागले आहेत. गणपती दर्शनाच्या निमित्ताने मुंबईत आलेले भाजपचे नेते अमित शाहांनी भाजप नेत्यांना कानमंत्र देताना मुंबई मनपामध्ये भाजपचाच महापौर बसवण्याचा संदेश दिला. मुंबई महापालिका महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्धार केला गेला. मात्र मुंबई महापालिकेत आपलाच महापौर बसवण्याचा निर्धार भाजपने केव्हाच केलाय.
दुसरीकडे एकनाथ शिंदेंनीही मुंबई मनपावर शिवसेनेचाच भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुंबईसाठी विशेष निर्णय घेतल्याचं शिंदेंनी अनेकदा सांगितलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. त्या मेळाव्याच्या बाहेर लागलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 'मुंबईचा महापौर शिवसेनेचाच' असे पोस्टर्स त्या ठिकाणी लागले होते. मात्र मेळाव्यात बोलताना शिंदेंनी महायुतीचा महापौर होणार असल्याचं भाकीत केलं. असं असलं तरी शिंदेंच्या शिवसेनेचाही मुंबईच्या महापौर पदावर दावा आहे हे लपून राहिलं नाही.
मुंबई मनपासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. एकीकडे महायुतीविरूद्ध ठाकरे बंधू अशी लढत असतानाच महायुतीतच शिवसेना विरूद्ध भाजप अशीही छुपी रस्सीखेच असल्याचं दिसतंय. त्यामुळे मायानगरी मुंबई कोणाचं स्वप्न पूर्ण करणार याची उत्सुकता आहे.