मुंबई: 'लोकसभा निवडणुकीपूर्वी आश्वासन दिल्याप्रमाणं आमच्या खात्यात 15 लाख कधी जमा करणार?' असा सवाल करत सामनानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीवरच टीकास्त्र सोडलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सामनातून भाजपच्या नेत्यांवर टीकेचे बाण सोडले जात आहेत. आजही सामनाच्या अग्रलेखातून मोदींना लक्ष केलं आहे.

 

विरोधक 15 लाख जमा होण्याच्या नावानं सरकारवर टीका करत आहेत. त्यामुळं नागरिकांच्या खात्यात 15 लाख जमा करुन मोदींना विरोधकांना शांत करायला हवे असं ही सामनामधून म्हटलं आहे.

 

एवढंच नाही तर काळा पैसा भारतात आणण्याचं आश्वासनही मोदींनी पूर्ण करायला हवं असंही सामनात म्हटलं आहे.

 

एक नजर सामनाच्या अग्रलेखावर:

 

मन की बात!

 

मोदी यांची ‘मन की बात’ कडक चायप्रमाणे आहे. ‘‘देश बदलत आहे, पण आम्हाला फुकट चहा नको. निवडणुकीपूर्वी वचन दिल्याप्रमाणे आमच्या बँकेत पंधरा लाख रुपये कधी जमा करताय ते सांगा?’’ असे एखाद्या तिरपागड्याने विचारले तर काय करावे? त्यास मारावे, जाळावे की धरावे असा प्रश्‍न काहींना पडू शकतो.

 

चायपेक्षा किटली गरम म्हणतात ते यालाच! अर्थात आमचे त्या तिरपागड्यांना उत्तर असे आहे की, बाबांनो, पंतप्रधान मोदी ५० वर्षांची घाण साफ करीत आहेत. मोदी यांना थोडा वेळ द्या. मात्र एखादा तिरपागडा सत्य बोलतो म्हणून त्यास मारावे, जाळावे असे बोलणे हे काही आपल्या संस्कृतीत बसत नाही. पंतप्रधान मोदी यांच्याविषयी ममत्व असल्यामुळेच आम्ही हे विनम्रपणे सांगत आहोत! 

 

पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रउभारणीचे जे कार्य हाती घेतले आहे त्यात काळ्या पैशांची ‘वापसी’ हे महत्त्वाचे काम आहे. सत्तेवर येण्याआधी मोदी यांनी जी वचने दिली त्यातले हे पहिल्या क्रमांकाचे वचन आहे. वचनपूर्तीसाठी पंतप्रधान मोदी व अर्थमंत्री जेटली शर्थ करीत आहेत व त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. आताही आपल्या पंतप्रधानांनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये दम भरला आहे की, ‘काळा पैसा सप्टेंबरच्या आधी जाहीर करा, अन्यथा परिणामांस तोंड द्या!’ पंतप्रधानांनी काळा पैसा जाहीर करण्याची ही अखेरची संधी दिली आहे. याचाच अर्थ असा की, साप बिळातच आहे व तो बाहेर यायला तयार नाही.

 

परदेशात दडवलेल्या काळ्या पैशाबाबत रामदेवबाबा यांच्यासारख्या मंडळींनीही आंदोलने, उपोषणे केलीच होती; पण आतापर्यंत किती काळा पैसा मायदेशी परत आला, याबाबत कुणीच छातीठोकपणे सांगू शकत नाही. निवडणुकीपूर्वी मोदी यांनी सांगितले होते की, परदेशी बँकांत दीड-दोन लाख कोटी रुपयांचा काळा पैसा दडवून ठेवला आहे. सत्तेवर येताच हा सर्व पैसा परत येईल व गरीबांच्या घराघरांतून सोन्याचा धूर निघेल. प्रत्येक हिंदुस्थानीच्या बँक खात्यावर किमान पंधरा लाख जमा होतील. अशा प्रकारे ‘अच्छे दिन’ चालत येतील, असे श्री. मोदी यांनी मोठ्याच आत्मविश्‍वासाने सांगितल्यामुळे देशभरातून त्यांच्यावर मतांचा पाऊस पडला व त्यांची बोट सत्तेच्या किनार्‍याला लागली. दोन वर्षांनंतर नक्की किती काळे धन देशात आले व किती देशवासीयांच्या बँक खात्यांत पंधरा लाख जमा झाले? अशी टीका विरोधक करीत आहेत. या विरोधकांना ‘चोख’ उत्तर देण्यासाठी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनाही रेडिओवर पाठवायला हवे, अशी टीका करणार्‍यांच्या जिभा हासडता येतील काय किंवा त्यांना जाळून मारता येईल काय? तेसुद्धा त्यांना ठरवावे लागेल.

 

आपली निवडणूक प्रक्रियाच काळ्या पैशांच्या भ्रष्ट पायावर उभी आहे. राज्यसभा, विधान परिषदेच्या निवडणुकांत उद्योगपतींनाच का लॉटरी लागते? व एकमेकांना पाडण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाला उद्योगपतीच का लागतात? या प्रश्‍नांच्या उत्तरातच काळ्या पैशाचे स्रोत दडलेले आहेत. हरयाणातील काँग्रेस आमदारांची १४ मते एकाच वेळी बाद होऊ शकतात हा चमत्कार काळ्या पैशांचा आहे. तामीळनाडूसारख्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत दोन्ही बाजूंनी पैशांचे वाटप झाले. ते पाहता काळा पैसा शोधण्यासाठी स्वित्झर्लंड किंवा मॉरिशसला पोहोचण्याची गरज नाही. बिहार आणि त्याआधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जो पैशांचा पाऊस पडला तो काही आकाशातील इंद्र देवाचा प्रताप नव्हता. राजकीय कुबेरांनीच त्यांच्या लपवलेल्या तिजोर्‍या उघडल्या होत्या. त्यामुळे काळा पैसा आपल्या देशातच आहे. तो उकरून काढला तरी पंतप्रधान मोदी यांचे मिशन सफल होईल.

 

पंतप्रधान मोदी ५० वर्षांची घाण साफ करीत आहेत. त्यांच्या हातात छडी जरूर आहे, पण ती जादूची छडी नाही. त्यामुळे फक्त दोन वर्षांत सर्व काही बदलून जाईल ही अपेक्षा ठेवू नका. पंतप्रधान मोदी यांना थोडा वेळ द्या. सर्व काही ठीक होईल. मात्र एखादा तिरपागडा सत्य बोलतो म्हणून त्यास मारावे, जाळावे असे बोलणे हे काही आपल्या संस्कृतीत बसत नाही. त्यामुळे मोदी यांचीच बदनामी होते. पंतप्रधान मोदी यांच्याविषयी ममत्व असल्यामुळेच आम्ही हे विनम्रपणे सांगत आहोत!