मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट प्रकरणी अटकेची कारवाई झालेल्या समीत ठक्करने सचिन वाझे प्रकरणी खळबळजनक ट्वीट केला आहे. सध्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एपीआय सचिन वाझे अडचणीत आले आहे. अशातचं या ट्वीटमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
काय आहे समीत ठक्करचं ट्वीट?
एनआयएच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, एपीआय सचिन वाझे यांच्या सीडीआरवरून असे दिसून येते की ते मनसुख हिरेन यांच्यासमवेत महाराष्ट्रातील एका नेत्याशी सतत संपर्कात होते. वाझे आणि नेते यांच्यात टेलीग्राम वर चॅट झाली आहे. तो विद्यमान आमदार एवढेच मी सांगू शकतो. कारण, मला माझ्या नावावर आणखी एक गुन्हा नकोय. एनआयए चौकशी करीत आहे, त्यांचं कर्तव्य त्यांना करुद्या. मला मिळालेली माहिती मी शेअर केली.
समीत ठक्करच्या या ट्वीटमुळे खळबळ उडाली असून हा आमदार कोण? त्यांचे सचिन वाझे यांच्याशी नेमके संबंध काय? मनसुख हिरेन यांचा मृत्यू कशाने झाला? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
याआधीही समीत ठक्कर वादात..
नागपूरचा रहिवासी समित ठक्कर याने ठाकरे पितापुत्रांच्याविरोधात ट्विटर वर दोन आक्षेपार्ह पोस्ट केले होते. याप्रकरणी नागपूर तसेच मुंबईच्या व्ही.पी. मार्ग पोलीस ठाण्यात ठक्कर विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. हा एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी ठक्करने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. नागपूर खंडपीठाने त्याला तिथल्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. मात्र, मुंबईत दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी आरोपी असल्यानं तो पळून जाऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. मुंबईच्या गिरगाव येथील दंडाधिकारी न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आले. यावर युक्तिवाद होऊ शकत नाहीच मात्र कोर्टानं आरोपीला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
कोण आहे समित ठक्कर?
- 32 वर्षांचा समित ठक्कर ट्विटरवर प्रचंड सक्रिय राहणारा नागपूरचा तरुण आहे
- नागपूरच्या व्हिएमवी कॉलेज मधून बीकॉमचे शिक्षण घेणारा समित आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे.
- त्याचे ट्विटरवर 60 हजार फॉलोवर आहेत, त्यामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल मंत्री पियुष गोयल यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्यांचा समावेश आहे.
- समित ठक्करचे कुटुंब नागपूरच्या वाथोडा भागातील व्यवसायिक कुटुंब असून सामान्य मध्यमवर्गीय आर्थिक स्थिती असलेले हे कुटुंब आहे.
- ठक्कर कुटुंबाचे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून समीत ही याच व्यवसायात सहभागी आहे
- या शिवाय ठक्कर कुटुंब अनेक सामाजिक उपक्रमात खासकरून मुक्या जखमी जनावरांच्या सेवेसाठीच्या कामात सहभागी होत असतो.
- समित उघडरीत्या कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नसला तरी शिवसेनेने समित भाजपचा कार्यकर्ता असल्याचे आणि आयटी सेलचा पदाधिकारी असल्याचा दावा केला आहे. तर भाजप ने तो आमचा कार्यकर्ता नाही असा दावा केला आहे.
- समितचे एक काका कधी काळी शिवसेनेचे स्थानीय नेते राहिले आहे. मात्र, आता ते पक्षात नाहीत.