ST workers strike मुंबई: एसटी कामगारांच्या संपामुळे ऐन सणासुदीच्या काळात राज्यातील प्रवाशांचे हाल झाले. त्यातच आता संपाची तीव्रता वाढल्याने राज्यभरातील प्रवाशांचे हाल सुरू आहेत. एसटी कामगारांच्या संपावर अद्यापही समाधानकारक तोडगा निघाला नसल्याने सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने खासगी वाहनांमधून प्रवासी वाहतुकीस मंजुरी दिली आहे. हा निर्णय आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. 


एसटी कामगारांचा संप चिघळत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. एसटीच्या संपामुळे लाखो सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. संपाच्या कालावधीत प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शासनाने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली. राज्य सरकारच्या गृह विभागाने मोटार वाहन अधिनियम 1988 (1988चा 59)चे कलम 66 चे उपकलम 3 खंड (एन) अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करून, सर्व खाजगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपनीच्या मालकीच्या बसेस, मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 


8 नोव्हेंबर 2021 च्या मध्यरात्रीपासून ही मंजुरी देण्यात आली असून संप, आंदोलन मागे घेर्इपर्यंत हा नियम लागू असणार आहे. 


संप मागे घेण्याचे आवाहन
एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि लोकांना वेठीस धरू नये असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले आहे. सरकारने हायकोर्टाच्या निर्देशानंतर समिती स्थापन करण्याबाबत जीआर काढला. आता हायकोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे परब यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांच्या आडून कोणी राजकारण करू नये असेही त्यांनी म्हटले.


आंदोलन सुरुच राहणार
एसटी कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी राज्य सरकारने तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. राज्याचे मुख्य सचिव या समितीचे अध्यक्ष असणार आहे. मात्र, या समितीच्या स्थापनेनंतरही एसटी कामगार संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे एसटी कामगार संघटनांनी म्हटले आहे. संघर्ष एस.टी. कामगार युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी कामगारांना कमिटी कमिटी खेळण्यात स्वारस्य नसल्याचे म्हटले. समिती नेमून काहीही साध्य होणार नसून मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन विलिनीकरणाचा निर्णय घ्यावा अशी मागणी शशांक राव यांनी केली आहे. एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलिनीकरण होईपर्यंत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शशांक राव यांनी म्हटले.