Sambhaji Raje : राज्यसभा खासदारपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आज कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांचे शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर ही भेट झाली. या भेटीमुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीनंतर बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी खासदारपदासाठी संधी दिल्याबद्दल आभार मानण्यासाठी ही भेट असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे खासदारकीची संधी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले. माझा राज्यसभा खासदारपदाचा कार्यकाळ संपला आहे. ज्यांनी मला संधी दिली ते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी भेट घेतली आहे. त्यांच्यामुळे मला गडकिल्ल्यांचे काम करता आले म्हणून आभार व्यक्त केले असल्याचे त्यांनी म्हटले. आज देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीत राजकीय चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. दोन राजकीय व्यक्ती भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये राजकीय चर्चा होणारच असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणासाठी कोर्टाच्या निर्देशांचे पालन करावे लागणार असल्याचे त्यांनी म्हटले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं ते सर्वांसाठी होतं. केवळ मराठ्यांशी नव्हतं, शाहू महाराजांनी देखील आरक्षण बहुजनांना दिले. त्यामुळे मी देखील बहुजनांसाठी आणि मराठ्यांनाआरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
राजकारणात प्रवेश?
राजकारणात प्रवेश करणार असल्याचे निश्चित असल्याचे त्यांनी म्हटले. याबाबत 12 तारखेला भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी म्हटले. पुढे काय करायचं हे माझ्या डोक्यात ठरलेलं आहे, त्यामुळे 12 तारखेला हे जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यसभेचे खासदार ते मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा
भाजपच्या शिफारशीवरुन 11 जून 2016 रोजी राष्ट्रपती कोट्यातून संभाजीराजे छत्रपती हे राज्यसभा खासदार झाले होते. त्यांच्या खासदारकीचा कार्यकाळ 3 मे रोजी संपला आहे. या कालावधीत भाजपच्या कोणत्याही राजकीय कार्यक्रमात त्यांची फारशी उपस्थिती दिसून आली नाही. सध्या त्यांचे भाजपसोबतचे संबंध ताणले गेल्याचं चित्र आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा ते चेहरा बनले आहेत. मराठा आरक्षणासाठी ते रस्त्यावर आणि न्यायालयीन लढा लढत आहेत.