मुंबई : राज्यातील लक्ष्यवेधी ठरलेल्या माहीम मतदारसंघामधील लढतीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. सदा सरवणकर माघार घेणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. आम्ही राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलो होतो, पण त्यांनी भेटच दिली नाही असा दावा सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी केला. तर निवडणूक लढायची तर लढा, नाहीतर माघार घ्या असं राज ठाकरेंनी सांगितलं. त्यामुळे आता विषय संपला असून निवडणूक लढवणारच असं सदा सरवणकर म्हणाले.


काय म्हणाले समाधान सरवणकर? 


राज साहेबांची भेट घेण्यासाठी गेलो पण त्यांनी आमची भेट टाळली. मुख्यमंत्र्यांनी जी काही समजूतदार भूमिका घेतली होती, त्यामुळे आम्ही राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलो. आम्ही आल्याचा दोनदा निरोप दिला. पण राजसाहेबांनी भेट दिलीच नाही. राजसाहेब घरी असल्यामुळे ते भेट देतील अशी अपेक्षा होती. पण ते वेगळ्या मनस्थितीत होते. त्यांनी भेट दिली नाही तर आम्ही काय करणार? राजसाहेब संबंध जपणारे नेते, म्हणून भेटायला गेलो होतो.


मनसेचे नितीन सरदेसाई म्हणाले की, मी काही निर्णय घेऊ शकत नाही. आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत. राज ठाकरे मोठे नेते आहेत. पण आम्हाला पहिल्यांदाच असा अनुभव आला. जरी आम्हाला भेट दिली नाही तरी त्यांच्याबद्दल आदर कायम असेल. ही लढाई आता जनतेने हाती घेतली आहे.


शिवसेनेच्या सदा सरवणकरांचा अर्ज कायम, माहीममध्ये मनसेचे अमित ठाकरे, महाविकास आघाडीकडून महेश सावंत तर महायुतीकडून सदा सरवणकर अशी तिरंगी लढत होणार. 


माहीममध्ये भाजपची भूमिका काय?


विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईच्या माहीम मतदारसंघातून मनसेनं राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर पुढच्याच दिवशी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी अमित ठाकरेंच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याबाबत आपली भूमिका जाहीर केली. त्यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन अमित ठाकरेंना महायुतीनं पाठिंबा देण्याची असलेली आवश्यकता बोलून दाखवली. मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तीच भूमिका मांडली. आता माहीम मतदारसंघातून लढण्याच्या निर्णयावर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर ठाम राहिल्यावर भाजपची नेमकी भूमिका काय आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांशी बोलून यातून काही मार्ग निघतो का ते पाहू असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. 


माहीममध्ये तिरंगी लढत


अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या मिनिटापर्यंत चाललेल्या ओढीनंतरही, माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतच होणार हे स्पष्ट झालं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सदा सरवणकरांची भेट घेण्यास नकार दिला आणि निवडणूक लढायची तर लढा असा निरोप दिला. त्यानंतर सदा सरवणकरांनीही त्यांचा अर्ज माघारी घेतला नाही. माहीममध्ये आता शिवसेनेचे सदा सरवणकर, मनसेचे अमित ठाकरे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत अशी लढत होणार आहे. 


ही बातमी वाचा: