नवी दिल्ली: शिवसेनेने सामना या मुखपत्रातून भाजप नेते यशंवत सिन्हांच्या नोटाबंदीबाबतच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे.


“आम्हाला काहीच म्हणायचे नाही. हे सर्व आम्ही वर्षभरापूर्वीच सांगितले होते. तेव्हा आम्ही देशद्रोही ठरलो होतो. आता यशवंत सिन्हा ठरतील” असं ‘सामना’त म्हटलं आहे. त्याचबरोबर देशभरातील ‘विकास’ वेडा झाल्याचं राहुल गांधींचं वक्तव्य शहाणपणाचं असल्याची कोपरखळीही सामनातून मारण्यात आली आहे.

सामनातील अग्रलेखाचा काही भाग जसाच्या तसा

गुजरातच्या विकासाचे काय झाले? असा सवाल करताच ‘विकास गांडो थयो छे!’ म्हणजे ‘विकास वेडा झाला आहे,’ असे उत्तर आता गुजराती जनता देत आहे. फक्त गुजरातच कशाला, संपूर्ण देशभरातच ‘विकास गांडो थयो छे’ म्हणजे विकास वेडा झाल्याचे चित्र भारतीय जनता पक्षाचेच वरिष्ठ मंडळ समोर आणीत आहे.

‘‘विकासाबाबत काहींनी पुष्कळ थापा मारल्याने विकास वेडा झाला असावा,’’ अशी शहाणपणाची टिप्पणी राहुल गांधी यांनी केली आहे. ई.व्ही.एम. मशीनमध्ये घोटाळे करून व पैशांचा वापर करून निवडणुका जिंकल्या म्हणजे विकास झाला असे काहींना वाटत आहे, पण विकासाची अवस्था बिकट झाली आहे. मनमोहन सिंग, चिदंबरम अशा ‘अर्थतज्ञां’नी कालपर्यंत हेच सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा मनमोहन सिंग व चिदंबरम हेच ‘गांडो थयो छे’ असे सांगण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता अर्थमंत्री पदावर प्रदीर्घ काळ राहिलेले हे लोक मूर्ख व आपण तेवढे शहाणे या भ्रमाचा भोपळा यशवंत सिन्हा या भाजपच्याच माजी अर्थमंत्र्यांनी फोडला आहे. देशाचा विकास दर हा ५.७ टक्के असल्याचे सांगितले जाते. तो प्रत्यक्षात ३.७ टक्केच असल्याचे बिंग फोडल्याबद्दल यशवंत सिन्हा हे बेइमान किंवा राष्ट्रद्रोही ठरवले जाऊ शकतात.

यशवंत सिन्हा यांना सत्य सांगितल्याबद्दल कोणत्या शिक्षेस तोंड द्यावे लागेल ते पाहू. पण नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेचा कसा फज्जा उडाला व देशात आर्थिक मंदीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर सिन्हा यांनी झोत टाकला आहे.

यशवंत सिन्हा काय म्हणाले होते?

दरम्यान काल इंडियन एक्स्प्रेसच्या अग्रलेखातून यशवंत सिन्हा यांनी नोटबंदीवरुन भाजपवर जोरदार टीका केली. होती मंदीच्या काळात नोटबंदी म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं असल्याचा घणाघात भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हांनी केला होता.

नोटबंदीनंतर पहिल्या तिमाहीत विकास दर घटून 5.7 टक्क्यांवर गेला आहे. जो गेल्या 3 वर्षातील सर्वात निचांकी आहे. त्याचसोबत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्यानं भडकत आहेत. भरीस भर म्हणून जीएसटीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती आणि संभ्रमाचं वातावरण आहे, असं यशवंत सिन्हा म्हणाले होते.

जयंत सिन्हांची सारवासारव

माजी अर्थमंत्री यशंवत सिन्हा यांच्या आरोपानंतर, त्यांचे पुत्र आणि भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा मोदी सरकारच्या पाठिशी उभे राहिले आहेत.

जयंत सिन्हा यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये लिहिलेल्या लेखात देशाची अर्थव्यवस्था पारदर्शक झाल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर मोदी सरकारनं अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक उपाय केल्याचा दावा जयंत सिन्हा यांनी केला आहे.

त्याचबरोबर येत्या काळात देशातील नागरिकांना याचा फायदाच होणार असल्याचं जयंत सिन्हा म्हणाले. जीएसटी, नोटाबंदी आणि डिजीटल पेंमेटमुळं देशाची अर्थव्यवस्था बळकट होत आहे, असा विश्वासही जयंत सिन्हांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

नोटाबंदीवरुन यशवंत सिन्हांचा घणाघात, आता पुत्र जयंत सिन्हांचं उत्तर

विकासाला काय झालं?, राहुल गांधींकडून मोदींच्या विकास मॉडेलची खिल्ली

मंदीत नोटाबंदी म्हणजे आगीत तेल : यशवंत सिन्हा

भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचं जगाने मान्य केलंय : राजनाथ सिंह