मुंबई विकास गांडो थयो छे!’ म्हणजे विकास वेडा झाला आहे, असं म्हणत कालच्या अग्रलेखातून भाजपवर वार करणाऱ्या शिवसेनेने आज 'सामना'तून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.

चंद्रकांत पाटील यांचे भाजप अध्यक्ष अमित शाहांशी चांगले संबंध आहेत, त्यामुळेच त्यांना महसूलमंत्रीपद मिळालं. शिवाय मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही त्यांचं नाव चर्चेत असतं. मात्र मुख्यमंत्रीपदाची आशा बाळगणाऱ्या एकनाथ खडसेंचं काय झालं हे विसरु नका, असा टोला सामनातून लगावला आहे.

शिवसेनेने सरकारविरोधी आंदोलन करुन स्वत:चं हसं करुन घेतलं. तसंच शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावरुन शिवसेनेने चंद्रकांतदादांना टार्गेट केलं.

‘सामना’ अग्रलेखातील काही भाग जसाच्या तसा

महागाईविरोधात आंदोलन केल्याने शिवसेनेचे हसे झाले असे जे म्हणतात त्यांची नाळ जनतेपासून तुटली आहे व सत्तेच्या नशेने त्यांचा ‘इक्बाल कासकर’ झाला आहे. कासकर हा ‘नशे’च्या फेऱयात सापडल्याने त्याला मागचे पुढचे काहीच आठवत नाही व तो असंबद्ध असे काहीतरी बडबडत असल्याचे पोलीस तपासात दिसत आहे. सत्तेच्या जहाल ‘खोपडी’ दारूने राज्यकर्त्यांच्या डोक्याची हातभट्टी झाल्यानेच त्यांना ‘महागाई’विरोधात आंदोलन करणारे मूर्ख, हास्यास्पद वाटत असावेत.

‘‘अच्छे दिन येणार, ते पहा आलेच आहेत’’ असे सांगून सत्तेत आल्यावरही ते ‘अच्छे दिन’ काही आलेच नाहीत. त्यामुळे मोदी सरकारचे घरोघरी हसू झाले आहे असे आम्ही बोललो तर पाटील यांची कळी खुलेल काय? शिवसेना फसवाफसवी करून सत्ता भोगीत नाही. शिवसेनेने सत्तेत राहून आंदोलने वगैरे करू नयेत असे चंद्रकांत पाटलांना वाटत असेल तर त्यांच्या सरकारने गोरगरीबांचे प्रश्न सोडवायला हवेत.

जनतेचे आशीर्वाद आम्हांस आहेत, पण सरकारला ते पटत नसेल तर त्यांच्या डोक्याचा ‘गांडो थयो छे!’ बरोबर ना, चंद्रकांतदादा!

विकास वेडा झाला

दरम्यान कालच्या अग्रलेखातून शिवसेनेने विकासाच्या मुद्द्यावरुन जोरदार टोले हाणले होते.

"गुजरातच्या विकासाचे काय झालेअसा सवाल करताच विकास गांडो थयो छे!’ म्हणजे विकास वेडा झाला आहे,’असे उत्तर आता गुजराती जनता देत आहे. फक्त गुजरातच कशालासंपूर्ण देशभरातच विकास गांडो थयो छे’ म्हणजे विकास वेडा झाल्याचे चित्र भारतीय जनता पक्षाचेच वरिष्ठ मंडळ समोर आणीत आहे", असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं होतं. 

 संबंधित बातम्या

हसं करुन घेतलेली शिवसेना सत्तेतून बाहेर पडूच शकत नाही : चंद्रकांत पाटील


विकास वेडा झाला आहे, 'सामना'तून टीकास्त्र यशवंत सिन्हांना पाठिंबा