मुंबई: एकीकडे खड्ड्यांमुळे लोकांचे जीव जात असताना दोघं सत्ताधाऱ्यांनी आता खड्ड्यांवरुनही एकमेकांची उणीधुणी काढायला सुरुवात केली आहे.

 
मुंबईत रस्ते कामात घोटाळ्याच्या पिपाण्या वाजवणाऱ्यांनी जरा नागपुरात पडलेल्या खड्डयांकडेही बघावं, असा सल्ला शिवसेनेच्या सामना वृत्तपत्रातून दिला आहे.

 

महाराष्ट्राप्रमाणेच भाजपची दिल्लीतही सत्ता आहे. गडकरी, फडणवीस यांसारखे नेते असतानाही नागपूरकर मात्र खड्ड्यांनी हैराण असल्याचं मत सामनातून मांडलं गेलं आहे.

 

एक नजर सामनाच्या अग्रलेखावर:

 

नागपूरकर ‘खड्डे’

 

महाराष्ट्राची उपराजधानी ‘खड्डेमुक्त’ करावी व जनतेस चांगले रस्ते मिळावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मुंबईतील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची ‘पिपाणी’ फुंकणार्यांरनी नागपुरातील खड्ड्यांबाबत तेथे फुंकल्या जाणार्याा तुतार्यां ची दखल घेतली तर लोकांना बरे वाटेल. नागपूरच्या महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची मजबूत पकड आहे. दिल्लीत आहेे तसे संपूर्ण बहुमताचे राज्य नागपुरात असले तरी बहुमत देणारी जनता खड्ड्यातून मार्ग काढीत कसेबसे जीवन कंठीत आहे. महानगरपालिकेचे काम नागरिकांना सुविधा देणे, रस्ते, नाले, गटारे, आरोग्यविषयक सुविधा पुरविणे; पण हे सर्व तेथील जनतेला मिळत आहे काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे शहर. पुन्हा दिल्लीतच ‘नागपूरकर’ गडकरी उच्चस्थानी आहेत. ही सर्व ‘बॉस’ मंडळी उच्चस्थानी बसून राजशकट हाकीत असताना नागपूरला या खड्ड्यांनी जो वात आणला आहे त्याची जबाबदारी कोणी घ्यायची?

 

नागपुरात सिमेंट रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची बोंब आहे. सिमेंट रस्ते तयार करताना जलवाहिन्यांचे नुकसान झाले. त्या नव्याने बसवायला हव्या होत्या. तसे झाले नाही. इतरही अनेक प्रश्नय नागपुरात ‘आ’वासून उभे असले तरी स्मार्ट सिटीच्या यादीत नागपूरचे नाव टाकून येथील जनतेची तोंडे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. पैसा कमी पडणार नाही. रस्त्यांची कामे खुशाल होऊ द्या, असा नारा नितीन गडकरी देत आहेत, पण नागपूरचे खड्डे हे त्यांच्यासाठी आव्हान आहे. स्वत: गडकरी हे नागपुरातून लोकसभेत निवडून गेले आहेत व सगळ्यात कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांनी मोठाच नावलौकिक मिळवला आहे; पण त्यांच्या स्वगृही रस्त्यांची जी चाळण झाली आहे तो सर्वच प्रकार चिंताजनक आहे.

 

रस्त्यांची चाळण करून जनतेच्या कोट्यवधी रुपयांना ‘गंडा’ घालणारे हे ठेकेदार कोण आहेत? त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून या लुटारूंना तुरुंगाची हवा खायला लावणे हाच न्याय ठरेल. नागपूर शहराचे एक स्वत:चे महत्त्व आणि प्रतिष्ठा महाराष्ट्राच्या दृष्टीने मुंबईइतकीच आहे. ‘संघ’ मुख्यालयापासून दीक्षाभूमीपर्यंत अनेक राजकीय तीर्थस्थाने ज्या नागपुरात आहेत त्या शहराचे रस्ते दुरुस्त करून जनतेला खड्डेमुक्त करा, अशी आम्ही कळकळीची विनंती करीत आहोत!