मुंबई : खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिश्चन धर्मियांबाबत केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर भाजपने त्यांना दिलेली समज, या मुद्द्यावरुन शिवसेनेने 'सामना'तून भाजपवर टीका केली आहे. राजकीय स्वार्थासाठी भाजपने गोपाळ शेट्टींना गुन्हेगार ठरवलं का? असा सवालही शिवसेनेने 'सामना'तून उपस्थित केला आहे.


भाजप पक्षश्रेष्ठींच्या दबावामुळेच गोपाळ शेट्टींवर माफी मागण्याची वेळ आल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. 'ख्रिश्चनांवरील वक्तव्यावरून भाजपच्या दिल्लीतील सर्वोच्च हायकमांडने गोपाळरावांना झापले व माफी मागायला लावली. या दाबदबावामुळे भावनाविवश शेट्टी हे खासदारकीचा राजीनामा द्यायला निघाले. माझ्या 'वाणी स्वातंत्र्यावर' अशी गदा येत असेल तर नको ते पद, अशी भूमिका शेट्टी यांना घ्यावी लागली. यावरून त्यांचा किती मानसिक छळ झाला असेल याची कल्पना येईल.'


'ओडिशातील जंगलात आदिवासींची धर्मांतरे करणाऱया फादर स्टेन्सची दोन दशकांपूर्वी त्यांच्या मुलासह निर्घृण हत्या झाली तेव्हा संपूर्ण ख्रिस्ती जग हादरले. ओडिशाचे त्यावेळचे मुख्यमंत्री जानकी वल्लभ पटनायक यांना काँग्रेस नेतृत्वाने तडकाफडकी हटवले. 'व्हॅटिकन चर्च'चा दबाव आला व "सोनिया गांधी या कॅथलिक असल्यामुळे इतक्या तडकाफडकी हटवले" अशी टीका तेव्हा हिंदुत्ववाद्यांनी केली, पण आता गोपाळ शेट्टींच्या बाबतीत काय झाले?'


'माफीसाठी, माघारीसाठी त्यांच्यावर पक्षांतर्गत दबाव आला. आता तर सत्तेत सोनिया गांधीही नाहीत व केंद्राने 'व्हॅटिकन'च्या दबावाखाली निर्णय घ्यावा अशी परिस्थितीदेखील नाही. तरी गोपाळ शेट्टी हे गुन्हेगार का ठरले? शेवटी हे राजकारण आहे. 2019 च्या निवडणुकीत ख्रिश्चन बांधवांना चुचकारण्याचा हा प्रयोग आहे. भाजपचे हे 'निधर्मी' रूप आता स्पष्ट व प्रकाशमान होताना दिसत आहे', असं सामनातून म्हटलं आहे.


राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी भाजप ख्रिश्चन धर्मियांचा वापर करत असल्याचे सामनातून अप्रत्यक्षरित्या सांगण्यात आलं आहे. 'हिंदुत्ववादी 'भाजप' राजकारणासाठी 'सेक्युलर' होत आहे व सर्वच धर्माचे लोक त्यांना हवे आहेत. त्यामुळे अयोध्येत रामजी कायमचे वनवासात गेले तरी चालतील. पालघरची लोकसभा निवडणूक येनकेनप्रकारे जिंकावी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वसईतील चर्चेस व मिशनऱयांच्या पायऱया झिजवल्या. तोसुद्धा एक राजकीय कावेबाजपणाच होता व तेथील ख्रिश्चन बांधवही त्या कावेबाजपणास भुलला हे आता मान्य करावे लागेल.'