मुंबई: 'देशात हिंदूंनी त्यांचे सण-उत्सव साजरे करणं हाच मुळात अपराध आहे.' अशी बोचरी टीका शिवसेनेनं आपल्या सामना या मुखपत्रातून केली आहे.
'न्यायालयीन निर्णयामुळे गोविंदा मध्येच लटकलेले आहेत. लोकांनी निवडून दिलेलं सरकार हात चोळत बसलं असून कोर्टच राज्यकारभार करीत आहे.' अशी थेट टीका करीत सेनेनं भाजपवरही निशाणा साधला आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टानं दहीहंडी नियमांच्या अटीसंदर्भातील पुनर्विचार याचिकेवर विचार करण्यास नकार दिला. जोगेश्वरीमधील जय जवान या पथकानं यासंदर्भातली याचिका दाखल केली होती. ज्यात 20 फुटांपेक्षा अधिकचे थर लावण्यात मूभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
दहीहंडीवरच्या कोणत्याही नियमांवर फेरविचार होणार नाही. असं कोर्टानं पुन्हा एकदा स्पष्टपणे बजावलं. त्यानंतर आज सामनातून या निर्णयाबाबत सेननं नाराजी व्यक्त केली आहे.
एक नजर सामनाच्या अग्रलेखावर:
लटकलेले गोविंदा!
* लोकांनी निवडून दिलेले सरकार हात चोळत बसले आहे आणि न्यायालय राज्यकारभार करीत आहे. म्हणून मुंबईतील ओल्या व सुक्या कचर्याचे काय करायचे इथपासून ते दहीहंडीचे किती थर लावायचे इथपर्यंत न्यायालये फर्मान सोडत आहेत. जर राज्यकर्ते हुकूमशहा बनतात म्हणून टीका होत असेल तर न्यायालयांची हुकूमशाही तरी स्वीकारायची काय? हिंदूंचे सण-उत्सव आले की न्यायालयांतील मटकी तडकू लागतात व त्या तडकत्या मटक्यांतून काय बाहेर पडेल ते सांगता येत नाही.
* आता दहीहंडीची उंची आणि ठरवून दिलेले नियम यात कोणतेही बदल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने आधी दिलेला निर्णयच कायम राहणार आहे. थोडक्यात, यावर्षी दहीहंडीचे थर २० फुटांपेक्षा जास्त रचता येणार नाहीत आणि दहीहंडी पथकात १८ वर्षांखालील गोविंदांना सहभागी होता येणार नाही, या न्यायालयीन निर्बंधांचे पालन करावेच लागणार आहे.
* साहजिकच सर्वच गोविंदा पथकांमध्ये प्रचंड नाराजी दिसत आहे. त्यामुळे गोविंदा पथकांचा तो नेहमीचा जल्लोष यावेळी दिसेल काय, हा एक प्रश्नच आहे. अर्थात गोविंदा पथके नाराज झाली म्हणून त्यांनी घरात बसू नये. हिंदू एकजुटीचे विराट दर्शन यानिमित्ताने घडवावे. म्हणजे हिंदूंचा आपल्या सण-उत्सवांबाबतचा आत्मविश्वास अधिक दृढ होईल. बरं, न्यायालयाने सुरक्षेचे सर्व उपाय योजूनच दहीहंडीचे मटके फोडावे असेही बजावले आहे. म्हणजे आता काय करायचे? अंगात चिलखत घालून थर लावावेत की बुलेटप्रूफ काचांचे पिंजरे लावून थर चढवायचे या प्रश्नांचा निचरा होणे गरजेचे आहे. याप्रश्नी ज्या राजकीय पुढार्यांनी राजकीय ‘नाद’ केला तेही शेवटी जे काही असेल ते नियमानेच करा, शिस्त पाळा, चुकीचे काही करू नका, अशा समन्वयाच्या मार्गदर्शनी भूमिका घेत आहेत.
* हिंदूंच्या सण-उत्सवांसंदर्भात राज्यपालांच्या सही-शिक्क्यांचा वटहुकूम निघण्याची शक्यता नाही. त्यासाठी महाराष्ट्रात फक्त भगव्या झेंड्याचे हिंमतबाज असे शिवसेनेचे एकहाती राज्यच असायला हवे. सरकारने दहीहंडीनिमित्त सुट्टी जाहीर केली. मुंबईतील दहीहंडीचा उत्साह लक्षात घेऊन राज्य सरकारने ही सुट्टी जाहीर केली, पण न्यायालयाने या उत्सवाच्या उत्साहावर टाकलेले विरजण सरकारने दूर केले असते तर या सुट्टीचा आनंद वाढला असता.
* हिंदूंनी त्यांचे सण-उत्सव साजरे करणे हाच मुळात हिंदूंच्या हिंदुस्थानात अपराध ठरत आहे. दहीहंडीबाबतही तेच घडताना दिसत आहे. न्यायालयीन निर्णयामुळे गोविंदा मध्येच लटकले आहेत. गोविंदा पथकांच्या संतापात आम्ही सहभागी आहोत. अर्थात, हिंदूंनी संतापाचा स्फोट घडवून तरी काय फायदा? त्यांच्या न्यायाचा ‘मटका’ नेहमीच लटकलेला असतो.