मुंबई : मॅनफोर्स कंडोमच्या जाहिरातीच्या प्रसारणावर बंदी घालण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) महिला आघाडीने केली आहे. मॅनफोर्सची जाहिरात अनैतिकता आणि अश्लिलतेचा प्रचार करणारी आहे, असा आरोप रिपाइं महिला आघाडीचा आहे.


अभिनेत्री सनी लिऑन करत असलेल्या मॅनफोर्स कंडोमच्या जाहिराती या अनैतिकता आणि अश्लिलतेचा प्रचार करणाऱ्या, तसेच समस्त महिला वर्गासाठी अपमानजनक असल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महिला आघाडीने या जाहिरातीच्या प्रसारणावर बंदीची मागणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे.

“एखाद्या कंडोमच्या जाहिरातीला आमचा विरोध नाह.  मात्र, या विशिष्ट कंपनीच्या जाहिरातीत करण्यात आलेले चित्रण हे सर्व कुटुंबाने एकत्रितपणे बसून पाहण्याजोगे नाही.”, असा आरोपही रिपाईच्या महिला आघाडीने केला आहे.

मॅनफोर्स कंडोमच्या जाहिरातीसंदर्भात आम्हाला अनेक महिलांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून ही जाहिरात सहकुटुंब पाहणे म्हणजे खुपच लज्जास्पद अनुभव असल्याचा दावा रिपाईच्या महिला आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे.

“मॅनफोर्सच्या जाहिरातील स्त्री पात्राच्या चेहऱ्यावरील बिभत्स आणि अश्लील भाव हे नैतिकता आणि महिलांच्या सन्मानाची पायमल्ली करणारे आहेत.  त्यामुळे आम्ही या तक्रारीद्वारे केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याला या जाहिरातीच्या प्रसारणावर बंदी घालण्याची विनंती केली आह.  तसेच संबंधित विभागाने आमच्या तक्रारीची दखल न घेतल्यास आम्ही राज्य महिला आयोगाकडेही दाद मागणार आहोत.” अशी माहिती रिपांच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी शीला गांगुर्डे यांनी दिली.