मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशानंतर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'छत्रपती' या उपाधीचा मान राखला गेला पाहिजे अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.


"छत्रपती या उपाधीवर संपूर्ण महाराष्ट्र मनापासून प्रेम करतो. त्या उपाधी मागे असणारा व्यक्ती नाही, तर ती उपाधी मला महत्त्वाची वाटते. अशावेळी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मोदी साहेबांच्या उपस्थितीत होणार असल्याचं सांगण्यात येतं, पण तो कार्यक्रम एका नेत्याच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या लॉनमध्ये आयोजित केला जातो. भारतीय जनता पक्षाला मला एकच सांगायचं आहे, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून व्यक्तीहून अधिक त्या उपाधीचा आम्ही मान ठेवला आहे. कोणतंही राजकारण न करता मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो की, जसा महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक तो मान ठेवतो, तसाच आपणही तो मान ठेवावा", अशी पोस्ट रोहित पवार यांनी लिहिली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी उदयनराजेंच्या पक्षप्रवेशावेळी हजर राहणार होते, मात्र ते उपस्थित राहू शकले नाही. अशा रीतीने नरेंद्र मोदी यांनी छत्रपती या उपाधीचा मान राखला नाही, असं रोहित पवार यांना वाटलं आणि ते फेसबूकवर व्यक्त झाले.



उदयनराजे भोसले यांनी काल नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे, यांच्यासह राज्यातल्या तसेच केंद्रातील अनेक दिग्गजांची हजेरी होती.


लोकांच्या हितासाठी मी हा भाजपप्रवेशाचा निर्णय घेतला आहे. पूर्णपणे निस्वार्थी भावनेने मी हे पाऊल उचलले आहे. मोदी-शाह देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जात आहेत, त्याचबरोबर त्यांनी लोकशाही मजबूत केली आहे. कलम 370 रद्द करण्याचा निर्णयदेखील याच सरकारने घेतला. त्यामुळे मी भारावून गेलो आहे, असं उदयनराजे यांनी म्हटलं.


VIDEO | उदयनराजेंच्या पक्षप्रवेशाचा भाजपला काय फायदा होणार? | नवी दिल्ली | माझा रिपोर्ट



संबंधित बातम्या