1 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या 'Once मोअर' या आगामी मराठी चित्रपटासाठी रोहिणी हट्टंगडी यांनी हे आजोबांचं पुरुषी रुप धारण केलं आहे. या भूमिकेसाठी रोहिणी यांनी किती मेहनत घेतली असेल याचा अंदाज फोटोतील गेटअपवरुन सहज येतो. 'Once मोअर' चित्रपटाच्या कथानकाची गरज म्हणून एकाचवेळी स्त्री आणि पुरुष अशी दुहेरी भूमिका साकारणाऱ्या सशक्त कलावंताची आवश्यकता होती. या भूमिकेला रोहिणी या न्याय देऊ शकतील हा विचार करुन दिग्दर्शक नरेश बीडकर यांनी रोहिणी हट्टंगडींना या भूमिकेची आवश्यकता समजावून सांगितली. भूमिकेचं आव्हान आणि त्यातील वेगळेपणा लक्षात घेत त्यांनी होकार दिला.
कमल हासन यांना बऱ्याच सिनेमांमध्ये गेटअप करणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट रमेश मोहंती, कमलेश आणि श्रीनिवास मेनगु यांनी 'Once मोअर' या चित्रपटासाठी रोहिणी यांना मेकअप केला आहे. रमेश आणि कमलेश यांनी प्रॉस्थेटिक मेकअपच्या सहाय्याने रोहिणी यांना आजोबांचं रुप दिलं आहे. या मेकअपसाठी रमेश आणि कमलेश यांच्या जोडीने रोहिणीताईंनीही खूप मेहनत घेतली आहे. चित्रीकरणाच्या पाच तास आधी रोहिणी यांना मेकअप करण्याची प्रक्रिया सुरु व्हायची. चित्रीकरण पूर्ण झाल्यावर दोन तास मेकअप काढण्यासाठी लागायचा. या काळात त्या काहीही खाऊ शकत नव्हत्या.
आजोबांच्या गेटअपमध्ये रोहिणी यांना केवळ अभिनय, संवादफेक करायची नव्हती, तर त्यात धावण्यापासून अॅक्शन सीन्सपर्यंत बऱ्याच गोष्टींचा समावेश होता. त्यामुळे या वयात रोहिणी यांना स्वीकारलेलं आजोबांच्या भूमिकेचं आव्हान आणि त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत नक्कीच कौतुकास्पद आहे. दिग्दर्शकावर दाखवलेला विश्वासही त्यांच्या भूमिकेला वेगळ्या उंचीवर नेत असल्याचं मत चित्रपटाचे दिग्दर्शक नरेश बिडकर व्यक्त केलं. आजवरच्या करिअरमधील ही नावीन्यपूर्ण आणि आव्हानात्मक भूमिका साकारण्याची संधी 'Once मोअर' या सिनेमामुळे मिळाल्याचं सांगितलं. "मला नेहमीच आव्हानं स्वीकारायला आवडतात. हे आव्हान मी स्वीकारणं धाडसाचं होतं पण यातही एक आनंद होता. त्यामुळेच पाच तासांची मेकअप प्रोसेस आणि गेटअपमध्ये अॅक्शन करणं हे देखील मी एन्जॅाय केलं. प्रेक्षकांनाही माझं हे रुप नक्कीच आवडेल," अशी अपेक्षा रोहिणीताईंनी व्यक्त केली.