ठाणे : बंगला मालकांच्या गाड्या धुण्याचे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या नेपाळी नोकराने मालकाला लुटलं आहे. बंगला मालक परेश रामदास पाटील कुटुंबासह बाहेरगावी गेल्याची खात्री करून आपल्या सहकाऱ्यांसोबत बंगल्याच्या ग्रील उचकटून कपाटात ठेवलेली रोकड आणि सोने चांदीचे दागिने लंपा सकेले. 27 लाख 54 हजाराचा मुद्देमाल लांबविल्याची घटना ठाकुर्ली इथे घडली होती.

गुन्हे कक्षाच्या पथकाने सापाला रचून या चौकडीला अटक केली. यामध्ये किसान डमरबहादूर साही, रोशन उर्फ जीवन पदम साही, राजू रतन उर्फ बाबू ओम बहादूर साही आणि जिरबहादूर एनबहादूर साही याना अटक करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे मकरंद रानडे यांनी दिली. मुख्य आरोपी कमल साही उर्फ मामा हा नेपाळ मूळगावी गेल्याने त्याच्या शोधासाठी पोलीस पथक प्रयत्नशील असल्याचेही रानडे यांनी सांगितले.

ठाकुर्लीत राहणाऱ्या परेश रामदास पाटील यांच्या बंगल्याला कुलूप लावून परिवारासह 13 मार्च रोजी सकाळी जेजुरी पुणे येथे गोंधळाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. 14 मार्च रोजी पाटील परिवार पुन्हा घरी परतला. त्यावेळी त्यांना बंगल्यात चोरी झाल्याचे दिसले. याबाबत 15  मार्च रोजी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.

या प्रकरणाचा तपास मालमत्ता गुन्हे कक्ष विभागाच्या पथकाने सुरु केला. त्यानंतर पोलीस हवालदार बाळासाहेब भोसले याना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पाटील यांची वाहने धुवणाऱ्या किसान नेपाळी याला पेंढारकर कॉलेज डोंबिवली पूर्व येथे सापळा रचून अटक केली.

किसन याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 6 महागडी घड्याळे, वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल आणि 28 हजार 330 रुपयांची रोकड सापडली. त्याची कसून चौकशी करताच त्याने सदर चोरी त्याचा साथीदार मामा उर्फ कमल साही याच्यासह केल्याची कबुली पोलीस पथकाला दिली.

किसन नेपाळी हा परेश पाटील यांच्या गाड्या धुण्याचे तब्बल पंधरा वर्षांपासून काम करीत होता. यातील फरारी आरोपी मामा उर्फ कमल साही  याला अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले असून त्यासाठी सीबीआय आणि इंटरपोलची मदत घेणार असल्याचे अप्पर आयुक्त मकरंद रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यापैकी काही आरोपींची आधी देखील घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये नोंद झालेली आहे.