मध्यरात्री नवी मुंबईच्या जुईनगर सेक्टर 11 मध्ये ही घटना घडली.
चोरट्यांनी बँकेशेजारील दुकानाजवळ खड्डा खणून, तिथून बँकेपर्यंत बोगदा तयार केला. त्या बोगद्यातून बँकेत शिरुन, त्यांनी 27 लॉकर्स लुटले.
ही चोरी शनिवारी की रविवारी रात्री झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
एक ग्राहक सोमवारी जेव्हा आपलं लॉकर उघडण्यासाठी लॉकर रुममध्ये गेला, त्यावेळी आजूबाजूचे 27 लॉकर्स तोडल्याचं दिसून आलं. जेव्हा ग्राहक लॉकर रुममध्ये आला, तेव्हा त्याच्यासोबत बँक कर्मचारीही उपस्थित होता. तेव्हा दोघांनीही जे चित्र पाहिलं ते धक्कादायक होतं.
लॉकर रुममध्ये एक भुयार होतं, ते शेजारच्या दुकानापर्यंत खणलं होतं. चोरट्यांनी या भुयारातून प्रवेश करुन, लॉकर फोडून लुटमार केली.
चोरट्यांनी लॉकरमधील दागिन्यांवरच डल्ला मारल्याचं पोलिसांनी सांगितलं.
दरोडेखोर फरार असून सीसीटीव्हीच्या आधारे काही सुगावा लागतो का, याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र चक्क जमिनीत भुयार खोदून बँकेची लूट केल्यानं पोलीसही थक्क झाले आहेत.