मुंबई : एकीकडे पुन:श्च हरिओम म्हणत अनलॉक करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या घरासमोरचा रस्ता मात्र गरज नसतांना बंद ठेवला. दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खाजगी निवासस्थान असलेल्या मातोश्रीजवळ एक चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. काही दिवसातच हा चहावाला कोरोनामुक्त झाला आहे. मात्र तेव्हापासून आजपर्यंत मातोश्री समोरचा वांद्रे पूर्व येथील मधुसुदन कालेलकर मार्ग गरज नसतांनाही सील करण्यात आला आहे. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एकीकडे वांद्रे पूर्व, खार विभागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढ रोखण्यातली कामगिरी संपूर्ण मुंबईत सर्वोत्तम आहे. इथे कोरोनाची रुग्णसंख्या वाढ मंदावली आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधीही वांद्रे पूर्व विभागात सर्वात जास्त आहे. गेल्या काही दिवसांत या परिसरात कोरोनाचे काही रुग्ण आढळले. यात शासकीय निवासस्थानातील लोक, पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.
मात्र महापालिकेच्या नियमानुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर आता संपूर्ण इमारतही सील होत नाही. आणि मातोश्रीच्या आजुबाजूच्या परिसरात रुग्ण सापडले असले तरी ते आता कोरोनामुक्त होऊनही बराच काळ लोटला आहे. अनावश्यकरित्या मातोश्रीसमोरचा नेहमीच्या रहदारीचा रस्ता प्रशासनानं बंद करु नये, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे.
त्यामुळे साहित्य सहवास, कलाभूषण, शारदा संगीत विद्यालय परिसरांत राहणाऱ्या रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. रहिवासी परिसरातून जाणारा हा नेहमीच्या वापराचा रस्त्याचा मातोश्रीसमोर भाग सील झाल्यानं येथील रहिवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे.साहित्य सहवास, कलाभूषण, शारदा संगीत विद्यालय परिसरांत राहणाऱ्या रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे.