मुंबईतील रस्ते बांधणीत 50% अनियमितता, आयुक्तांच्या अहवालानं खळबळ
एबीपी माझा वेब टीम | 25 Apr 2016 04:06 PM (IST)
मुंबई : मुंबईत गेल्या वर्षभरात झालेल्या रस्ते बांधणीत 50 टक्क्यांपर्यंत अनियमितता आढळल्याचं खुद्द मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर आणि पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी स्पष्ट केलं आहे. चौकशी समितीनं मुंबईतील 34 कामांची तपासणी केली. ज्यात निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरणं, कामं अपूर्ण ठेवणं यासह अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. या सगळ्या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करुन त्यांना काळ्या यादीत टाकणार असल्याचंही महापौरांनी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे याप्रकरणात पालिकेचे मुख्य अभियंता अशोक पवार यांच्यासह प्रशासनातली बडी नावं अडकण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. गेल्या वर्षी महापौर स्नेहल आंबेकर यांनी रस्ते बांधणीतील घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करुन खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले. ज्याचा अहवाल सादर करण्यास टाळाटाळ होत होती.