मुंबई : 5 मे हा दिवस जागतिक व्यगंचित्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक व्यंगचित्रकार दिनाच्या निमित्तानं आर के लक्ष्मण यांचा कॉमन मॅन पुन्हा एकदा चर्चेत आलाय. त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे कॉमन मॅनची पुढची आवृत्ती लवकरच कॉमन वुमनच्या स्वरुपात लोकांच्या भेटीला येणार आहे. आणि ही कॉमन वुमॅन साकारणार आहे, दस्तुरखुद्द आर के लक्ष्मण यांची नात रिमानिक लक्ष्मण.


कॉमन मॅनने सर्वसामान्य लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न, समस्या आणि पदोपदी करावे लागणाऱ्या संघर्षावर मार्मिक व्यंगचित्रातून भाष्य केलं. हाच वसा आता पुढे कॉमन वुमन चालवेल, असं आर के आयपीआर मॅनेजमेंटच्या वतीनं सांगण्यात आलंय.

कॉमन वुमनच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न, स्त्री-पुरुषांमधील भेदभाव यांवर प्रामुख्यानं व्यंगचित्राच्या माध्यमातून भाष्य करण्यात येणार आहे. महिलांचं प्रबोधन करण्यासोबतच महिलांना जागृत करण्याचं मोलाचं काम कॉमन वुमन करणार असल्याचं सांगितलं जातंय.

आर के आयपीआर मॅनेजमेंट, हा व्यंगचित्रकारांचा समूह आहे. या समूहातील व्यंगचित्रकार वेळोवेळी राजकीय आणि सामाजिक विषयांवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून मार्मिक भाष्य करत असतात. 2015 साली ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचं निधन झालं. त्यानंतर कॉमन मॅन साकारणाऱ्या आर के लक्ष्मण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अनेक व्यंगचित्रकारांनी एकत्र येत आर के आयपीआर मॅनेजमेंट समूहाची स्थापना केली.

आता लवकरच कॉमन वुमन लोकांच्या भेटीला येईल. दरम्यान, कॉमन मॅन अँन्ड कॉमन वुमन या शीर्षकाखाली व्यंगचित्र करण्याच्या संकल्पनेवर आर के लक्ष्मण यांच्याशीही बातचीत करण्यात आली होती. त्यावेळी आर के लक्ष्मण यांनीही रिमानिका लक्ष्मण यांना यावर काम करण्यासाठी प्रोत्साहितही केलं होतं. मात्र, कॉमन वुमन साकरण्याआधीच आर के लक्ष्मण यांचं निधन झालं.

आता रिमानिका लक्ष्मण आर के लक्ष्मण यांचा वारसा पुढे चालवणार आहे. त्यासाठी रिमानिका लक्ष्मण यांनी कॉमन वुमन वर आधारलेल्या व्यंगचित्रांवर जोमानं काम करायला सुरुवात देखील केली आहे. त्यामुळे लवकरच न्यू कॉमन मॅन आणि कॉमन वुमन लोकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्तानं लक्ष्मण यांचा वारसा त्यांची नात कशी चालवते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.