मुंबई: शिवसेनेच्या महापौर स्नेहल आंबेकर अखेर वॉर्ड क्र. 198 मधून अर्ज भरणारअसल्याचं निश्चित झालं आहे. 'मातोश्री'वरुन आदेश आल्यानंतर शिवसैनिकांचा आंबेकरांना असणारा विरोध माळवला आहे.

स्नेहल आंबेकर यांना वॉर्ड क्र. 198 मधून विरोध असल्यानं त्यांना वॉर्ड क्र. 195 मधून उमेदवारी देण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. मात्र, काल रात्री पुन्हा एकदा वॉर्ड क्र. 198 मधूनच आंबेकर यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झालं.

स्नेहल आंबेकर या महापौर आहेत. त्यामुळे त्यांना निवडून आणणं शिवसेनेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. असा मातोश्रीवरुन निरोप आल्यानं या वॉर्डातील शिवसैनिकांनी आपला विरोध कमी केला असल्याचं सुत्रांकडून समजतं आहे.

- शिवसेनेत बंडखोरी सुरुच, शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख अभिषेक सावंत यांच्या पत्नी आदिती सावंत वॉर्ड क्र. 200मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार

प्रभादेवीमध्ये शिवसेनेविरोधात बंडाळी, शिवसेनेचे महेश सावंत अपक्ष निवडणूक लढवणार:

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास अवघे काही तास शिल्लक असताना शिवसेनेमधील बंडखोरी वाढतच आहे. कालच विद्यमान नगरसेवक नाना अंबोले आणि दिनेश पांचाळ यांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या प्रभादेवीमध्येही आज एक बंडाळी समोर आली आहे.

प्रभादेवीतील शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांना तिकीट दिल्यानं शिवसेनेचे नाराज महेश सावंत यांनी त्याविरोधात बंड पुकारलं आहे. महेश सावंत हे प्रभादेवी वॉर्ड 194 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे प्रभादेवी विभागात शिवसेनेचाच अंतर्गत सामना रंगणार आहे.

दरम्यान, काल रात्री उशीरापर्यंत ‘मातोश्री’वरची सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात वाटाघाटी सुरु होत्या. अखेर समाधान सरवणकर यांच्या बाजूनं मत दिल्यानं शिवसेनेच्या महेश सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

खरंतर 194 वॉर्ड महत्वाचा समजला जातो. दादर, माहिम, प्रभादेवी हे शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जातात. पण आता या भागातच शिवसैनिक एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत.

आतापर्यंत शिवसेना सोडलेले नगरसेवक
नाना आंबोले – लालबाग परळ
दिनेश पांचाळ – अणुशक्ती नगर
प्रभाकर शिंदे – मुलुंड

शिवसेनेचा हुकमी एक्का भाजपमध्ये, नाना आंबोलेंचा जय महाराष्ट्र

दक्षिण मुंबईतील लालबाग-परळमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. नाराज विद्यमान नगरसेवक नाना आंबोले यांनी शिवसेनेला रामराम करत भाजपची वाट धरली.

नाना आंबोले यांचा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाल्याने पत्नीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी ते आग्रही होते. मात्र स्थानिक आमदार अजय चौधरी यांच्याशी वाद असल्याने पत्नीला उमेदवारी मिळत नव्हती. अखेर नाराज नाना आंबोल यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

लालबाग परिसरात लोकप्रिय नगरसेवक म्हणून नाना आंबोलेंची ओळख आहे. आंबोले दोन टर्म शिवसेनेकडून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे आंबोले यांच्या भाजप प्रवेशामुळे लालबाग परळ परिसरात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

शिवसेना नगरसेवक दिनेश पांचाळही भाजपत

खासदार पत्नीला तिकीट दिल्यानं शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक दिनेश पांचाळ यांनी भाजपप्रवेश केला आहे.  खासदार राहुल शेवाळेंच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना अणुशक्ती नगर वॉर्ड १४४ मधून शिवसेनेनं तिकीट दिलं आहे. त्यामुळे दिनेश पांचाळ यांनी भाजपप्रवेश केला. दरम्यान भाजपकडून दिनेश पांचाळ यांच्या पत्नी अनिता पांचाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अमेय घोलेंच्या उमेदवारीला विरोध
युवा सेना कोषाध्यक्ष आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अमेय घोले यांना वडाळा वॉर्ड क्र. 178 मधून उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र त्याला स्थानिक शिवसैनिकांचा विरोध होत आहे. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी शिवसेना शाखेला टाळं ठोकलं. इच्छुक उमेदवार माधुरी मांजरेकर समर्थक रस्त्यावर उतरले आहेत.

संबंधित बातम्या:

पक्ष सोडण्यास कारण की… शिवसेनेतील गयारामांचं उत्तर

शिवसेनेचा हुकमी एक्का भाजपमध्ये, नाना आंबोलेंचा जय महाराष्ट्र

शिवसैनिकांची बंडाळी मोडीत, किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी


मी महापालिका निवडणूक लढवणार नाही : शुभा राऊळ


मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर