मुंबई: अवैध होर्डिंगवर कारवाई करत रहा, असे आदेश आता थेट उच्च न्यायालयानेच सोमवारी राज्य शासन व स्थानिक प्रशासनांना दिल्याने अनेक राजकीय पक्षांची गोची झाली आहे. कारण, यापुढे त्यांना आपल्या नेत्याच्या वाढदिवसावेळी रितसर परवानगी घेतल्याशिवाय असे होर्डिंग लावून शहाराचे विदरुपीकरण करता येणार नाही.


 

याआधीही शासन व स्थानिक प्रशासनाने अवैध होर्डिंगवर कारवाई केली आहे, ही कारवाई यापुढेही सुरू ठेवा, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले. तसेच यावेळी अवैध होर्डिंगप्रकरणी न्यायलयाने मनसेलाही चांगलेच फटकारले आहे.

 

अवैध होर्डिंगप्रकरणी मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरातून डझनभर याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी सुरू आहे. अवैध होर्डिंगवर कारवाई करा, असे आदेश न्यायालयाने स्थानिक प्रशासन व शासनाला दिले आहेत. न्या. शंतनू केमकर व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

 

या आदेशानुसार कारवाई सुरू असल्याचे मुंबई पालिकेने न्यायालयाला सांगितले. शासनानेदेखील कारवाई सुरू असल्याचा दावा केला. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने वरील आदेश दिले व ही सुनावणी तहकूब केली.