मुंबई : आपण कितीही आधुनिकतेच्या बाता मारल्या, तरी तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन अजूनही कित्येकांचा बदललेला नाही. कुणी तृतीयपंथी दिसला की नाकं मुरडणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशा काहीशा अस्वस्थ करणाऱ्या भोवतालात आणि सकारात्मकतेला काळोखाने व्यापू पाहणाऱ्या वातावरणात प्रकाशाचा एक आशादायक किरण म्हणजे ‘थर्ड आय कॅफे’.

नवी मुंबईतील ‘थर्ड आय कॅफे’ आणि इथे काम करणाऱ्या मही, जोया, सोनाली, जॉजेन या साऱ्या तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल, असे काम करत आहेत. तृतीयपंथीय समाजाला एक नवी दृष्टी आणि स्वाभिमानी ओळख दिली आहे.

निमिश शेट्टी, प्रसाद शेट्टी आणि नितेश कंदरकर या तिघांनी मिळून डिसेंबर महिन्यात नवी मुंबईत एक रेस्टॉरंट उघडलं. ‘थर्ड आय कॅफे’ असं त्याचं नाव. खरंतर हे तिघेही वेगवेगळ्या क्षेत्रातले. निमिश आर्किटेक्चर क्षेत्रातील, प्रसाद मार्केटिंग क्षेत्रातील, तर नितेश बँकिंग क्षेत्रातील. हे रेस्टॉरंट उघडण्यामागे त्यांची एक अनोखी अन् तेवढीच अभिमानास्पद अशी संकल्पना होती.

‘थर्ड आय कॅफे’ या रेस्टॉरंटमध्य या तिघांनी वेटरपासून मॅनेजरपर्यंत तृतीयपंथीयांना नोकरी दिली. अर्थात, नावं ठेवणाऱ्यांनी ठेवलीच. मात्र पाठीवर कौतुकाची थाप देऊन प्रोत्साहन देणारेही अनेकजण होते.



जॉजेन मॅनेजर आहेत, तर माही, सोनाली, जोया, मालिनी वेटरचं काम पाहतात. ग्राहकांच्या स्वागतापासून त्यांना कोणता मेन्यू आवडेल इथवर, सर्व कामं अगदी आनंदाने करतात. या रेस्टॉरंटच्या निमित्ताने त्यांना एक वेगळं व्यासपीठ मिळालं आहे, जिथे स्वत:ला सिद्ध करणे शक्य आहे.

“ज्यावेळी मी कामाला सुरुवात केली, तेव्हा मनामध्ये भीती होती. लोक स्वीकारतील का वगैरे. पण लोकांकडून खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. आता आमच्यामध्ये टेबल अटेंड करण्यासाठी भांडण होत आहेत.”, असे किती आनंदाने माही सांगत होती.

तृतीयपंथीयांना व्यासपीठ मिळालं पाहिजे, त्यांना कामं मिळाली पाहिजे, अशा फक्त वाऱ्यावरील बाता न मारता, निमेश-प्रसाद-नितेश या त्रिकुटाने ते सत्यात उतरवलं आणि एका आदर्श पावलाची वाट चालली आहे.